मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ  

35 वर्षांच्या राजकारणात पीयुष गोयल यांनी यंदा 2024 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

येत्या काही तासात मोदी 3.0 च्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे, यावेळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यांच्या मंत्रिमंडळात तीस मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मंत्रिमंडळात माजी रेल्वे मंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार पीयुष गोयल शपथ घेणार आहेत. 

35 वर्षांच्या राजकारणात पीयुष गोयल यांनी यंदा 2024 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. पीयुष गोयल यांचा जन्म 13 जून 1964 रोजी मुंबईत झाला. माटुग्ंयातील डॉन बॉस्कोमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. पीयुष गोयल पेशानं सीए असून याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पीयुष गोयल यांनी येल, ऑक्सफर्ड आणि प्रिन्स्टन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांमध्येही त्यांनी काही काळ अभ्यास केला. पीयुष गोयल यांचा विवाह सीमा गोयल यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुलं आहेत. पीयुष गोयल यांनी काही काळ भारतातील बड्या बँकांच्या संचालक मंडळावर काम केले आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या वित्तविषयक आणि संरक्षण समितीचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय, इंडियन मर्चंट चेंबर्सच्या व्यवस्थापकीय जबाबदाऱ्यांचाही त्यांना अनुभव आहे.

Advertisement

नक्की वाचा - Modi 3.0: एकही खासदार नाही, तरीही सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री, 'लकी' रामदास आठवले

पीयुष गोयल यांची आई चंद्रकांता गोयल आणि वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. चंद्रकांता गोयल तीन वेळा महाराष्ट्रातील विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. वेदप्रकाश गोयल यांनी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रात मंत्रिपद भूषवलं होतं. यावेळी भाजपचे खजिनदार ही त्यांच्यावर जबाबदारी होती. 2014 च्या निवडणुकीत मोदी यांच्या प्रचाराचे व्यवस्थापन करणाऱ्या नेत्यांमध्ये गोयल यांचा समावेश होता. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेल्या एकालाही संधी देण्यात आली नव्हती. यावेळी राज्यातून पक्षाने त्यांना मागेच राज्यसभेवर पाठवले होते.

Advertisement

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे आणि कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला. 3 डिसेंबर 2017 मध्ये तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिल्यानंतर रेल्वे खात्याचा कारभारही पीयुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला. रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. यानंतर भाजपचे दिवंगत नेते अरूण जेटली यांच्या आजारपणाच्या काळात पीयूष गोयल यांनी अर्थखात्याची जबाबदारीही सांभाळली होती. मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा पीयुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती. पीयूष गोयल केवळ मोदी आणि शाह यांच्या विश्वासातीलच नव्हे तर चांगली कामगिरी करणाऱ्या केंद्रीय नेत्यांपैकी एक आहेत.

Advertisement