शरद पवार गटाबरोबरच अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. अजित पवारांनी चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. निमगाव सावा, साकोरी त्यानंतर पारगाव तर्फे आळे या गावात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता. यावेळी पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांना घोड्यावर बसण्याची विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत खासदार डॉ. कोल्हे घोड्यावर बसले. यांच्या सोबत शिवसेना नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी गोड्यावर बसवत मिरवणूक काढली. दरम्यान सकाळी निमगाव सावा येथे ग्रामस्थांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत स्वागत केले. त्याचबरोबर साकोरी येथे देखील डॉ. कोल्हे यांची मोठी सभा पार पडली, तर पारगावतर्फे आळे येथील ग्रामस्थांनी खासदार डॉ. कोल्हे यांची घोड्यावर बसून मिरवणूक काढली.
यापूर्वी खासदार डॉ. कोल्हे यांनी 2019 साली लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यत सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. ज्यावेळी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी ग्रामस्थांना शब्द दिला होता. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर अमोल कोल्हे फेब्रुवारी 2022 मध्ये खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील मानाच्या यात्रेत बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर घोडी धरली होती. त्यानंतर आज पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात खासदार अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.
पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, की मी जर घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतंय असा टोला डॉ. कोल्हे यांनी विरोधकांना लगावला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, पांडुरंग साळवे, भास्कर गाडगे, आनंद चौघुले, जयंवत घोडके, निवृत्ती साळवे, दत्ता गाडगे, शरद चौधरी, सुरज वाजगे, शरद चौधरी, गुलाब पारखे, संभाजी चव्हाण, राहुल चव्हाण, सुरेखा विटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.