Municipal Election 2026 : महाराष्ट्राच्या महानगरपालिकांचा निकाल हळूहळू हाती येत आहे. आतापर्यंतच्या (११.३० AM) निकालाच्या कलानुसार राज्यातील २८६९ प्रभागांपैकी भाजप ४९६ प्रभागांवर आघाडीवर आहे. निकाल सुरू झाल्यानंतर पहिल्याच तासात भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील काही भागात मतमोजणी केंद्रांवर गोंधळाचं वातावरण होतं.
मुंबईत भाजप ४५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना उद्धव ठाकरे गट ३५ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गटाकडून भाजपला कांटे की टक्कर दिली जात आहे. मनसे मुंबईत दोन जागांवर आघाडीवर आहे. त्याशिवाय शिवसेना शिंदे गट २० जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपच आघाडीवर असल्याचं दिसत आहे. पुण्यात भाजप ४७, अजित पवार गट १७, काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप ३८, अजित पवार गट ११, शिवसेना शिंदे गट १ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांनी आपल्या वचननाम्यात महिलांसाठी मेट्रो आणि बस सेवा मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात या घोषणा पुणेकरांच्या फारशा पचनी पडले नसल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - Maharashtra Election Result LIVE: पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी, प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे पिछाडीवर
पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ, बिबेवाडी येथील चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षचे तीन उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही एक उमेदवार यशस्वी ठरला आहे. भाजपकडून राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे यांचा पराभव करत आपली जागा कायम राखली. घुले यांच्या विजयामुळे प्रभागात राष्ट्रवादीची उपस्थिती टिकून राहिली.