'राम मंदिरामुळे माझा पराभव', शिर्डीचे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडेंचं वादग्रस्त विधान, नंतर दिलं स्पष्टीकरण

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
शिर्डी:

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा महायुतीच्या प्रचारातील मुख्य मुद्दा होता, पंतप्रधान मोदींच्या भाषणात देखील वेळोवेळी राम मंदिरावरून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला. मात्र एकीकडे हे चित्र दिसून आलेलं असताना दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

'अयोध्येतील राम मंदिर हे देखील माझ्या पराभवामागील एक कारण असून शिर्डीत लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा समाज मोठा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं'. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान याच विषयावरून शिर्डीमध्ये सोमवारी सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

नक्की वाचा - 'मी निवडून हिरो झाले असते, ते कुणाला कसं आवडेल'; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

'माझे वक्तव्य काही टीव्ही वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले. मात्र राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लीम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यात रावण संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अप्रचार त्यामुळे माझा पराभव झाला असल्याचे मी वक्तव्य केले होते' असं म्हणत त्यांनी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जतमध्ये काही पत्रकारांनी मला विचारलं की, राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला? त्यावर मी उत्तर देतांना अकोले तालुक्यातील रावण संघटनेचा उल्लेख केला. रावण संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचं मी म्हटलं होतं, असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.