Nagpur News : बंडखोरी नडली, घर फुटलं! भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं नवऱ्याचं घर; नागपुरात मोठी खळबळ

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे. इथं माजी महापौरांनी नाराज होऊन नवऱ्याचं घर सोडलंय.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे. राजकारण आणि कुटुंब जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते, याचे दाहक चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे. भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी घर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे पती विनायकराव डेहनकर यांनी पक्षाविरुद्ध केलेली बंडखोरी. एका बाजूला पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला पतीचा निर्णय, अशा कात्रीत सापडलेल्या माजी महापौरांनी सध्या माहेरी जाणे पसंत केले आहे.

निवडणूक आणि घरगुती कलह

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे विनायकराव डेहनकर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, अर्चना डेहनकर यांना पतीचा हा निर्णय रुचलेला नाही. पक्षाने त्यांना 2009 ते 2012 या काळात महापौरपद दिले, त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणे त्यांना चुकीचे वाटते.

याच मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि अर्चना डेहनकर यांनी घर सोडले. विनायकराव यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला असून, ती माहेरी गेली आहे पण यात माझी काहीच चूक नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

( नक्की वाचा : Nagpur News : 'आमची शिवसेना भाजपाला विकली'; नागपुरात शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी )

कोण आहेत डेहनकर?

विनायकराव डेहनकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीचे जुने कार्यकर्ते आहेत. ज्या काळात गणेशपेठ भागात काँग्रेसचे मोठे नेते असताना भाजपचे अस्तित्व नगण्य होते, त्या काळात त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली.

Advertisement

प्रभाकरराव दटके आणि अशोकराव वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले. जेव्हा वॉर्डात महिला आरक्षण आले, तेव्हा त्यांच्या पत्नीला पक्षाने संधी दिली आणि त्या महापौरही झाल्या. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे.

( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप

बाहेरून आलेल्या लोकांना किंवा इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप विनायकराव यांनी केला आहे. काँग्रेसमधून आलेल्या पती-पत्नीला भाजपने उमेदवारी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संताप असल्याचे ते सांगतात.

Advertisement

पक्ष वाढवण्यासाठी हे आवश्यक असले तरी, वर्षानुवर्षे रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोठ्या नेत्यांनी आश्वासन देऊनही तिकीट न मिळाल्याने ते अधिक दुखावले गेले आहेत.

आणि डेहनकरांना रडू कोसळले

आपल्या घरातील कपाटात साठवलेली पक्षाची उपरणे आणि पदवीधर निवडणुकीसाठी गोळा केलेले अर्जांचे गठ्ठे दाखवताना विनायक डेहनेकर  यांना रडू कोसळले. इतकी वर्षे ज्या पक्षासाठी काम केले, त्याच पक्षाने अखेरच्या क्षणी पाठ फिरवल्याची खंत त्यांच्या डोळ्यात दिसत होती. 

Advertisement

पत्नीला अन्याय झाल्याचे मान्य असले तरी तिची भूमिका पक्षाच्या बाजूने आहे, तर आपली भूमिका स्वाभिमानाची आहे, असे सांगत त्यांनी आता मागे फिरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.