जाहिरात

Nagpur News : 'आमची शिवसेना भाजपाला विकली'; नागपुरात शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी

Nagpur Municipal Election 2026:  नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी, या जागावाटपावरून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

Nagpur News : 'आमची शिवसेना भाजपाला विकली'; नागपुरात शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
नागपूर:

Nagpur Municipal Election 2026:  नागपूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र अर्ज भरण्याची मुदत संपताच महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. 

नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी, या जागावाटपावरून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. ही नाराजी आता थेट रस्त्यावरील आंदोलनापर्यंत पोहोचली असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच पक्षांतर्गत बंडाचे निशाण फडकावले गेले आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूर महापालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी शिवसेनेकडून सुरुवातीला 25 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात जागावाटपाचा आकडा समोर आला तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला केवळ 8 जागा आल्याचे स्पष्ट झाले. हक्काच्या जागा भाजपच्या पदरात गेल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांचा संयम सुटला. केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागल्याने हा शिवसेनेचा अपमान असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

( नक्की वाचा : सांगोल्यात राजकीय संस्कृतीचा ऱ्हास? गणपतराव देशमुखांच्या नातवावरच गंभीर आरोप; दोन भावांमधील वाद चव्हाट्यावर )

जागावाटपाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या धंतोली परिसरातील पूर्व विदर्भ विभागीय कार्यालयासमोर जोरदार प्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आशिष जयस्वाल मुर्दाबाद आणि देना होगा जवाब देना होगा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. 

कार्यकर्त्यांचा राग इतका अनावर झाला होता की, त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीरपणे जाळून आपला निषेध नोंदवला. 'आमची शिवसेना भाजपाला विकून टाकली,' असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

( नक्की वाचा : Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )

दिग्गज नेत्यांच्या दबावाखाली पक्ष दबल्याची चर्चा

नागपूर हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या या बड्या नेत्यांसमोर शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व हतबल झाले असून त्यांच्या दबावाखाली पक्ष दबून गेल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे. आपली ताकद असतानाही नेत्यांनी भाजपसमोर शरणागती पत्करली आणि पक्ष विकला, अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. 

या नाराजीचे पडसाद आता निवडणुकीच्या रिंगणातही उमटताना दिसत आहेत. संतप्त झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी काही प्रभागांमध्ये बंडखोरी करत आपले स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारून अपक्ष म्हणून लढण्याची तयारी या बंडखोरांनी केली आहे. 

विशेष म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत आपले अर्ज मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रचाराच्या काळात हा अन्यायाचा मुद्दा मतदारांपर्यंत नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बंडखोरीमुळे अधिकृत युतीच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, याचा फायदा कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com