राणेंना उमेदवारी, शिंदेंच्या पदरी निराशा, रत्नागिरी -सिंधुदुर्गही हातून गेला

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राणेंवर विश्वास दाखवत त्यांना उमदेवारी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एका मतदार संघावर पाणी सोडावे लागले. त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील हा मतदार संघ त्यांना भाजपसाठी सोडावा लागला आहे. या मतदार संघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते. मात्र आता राणेंना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्यावर राणेंचा प्रचार करण्याची वेळ आली आहे.  
 
रत्नागिरी - सिंधुदुर्ग ही भाजपच्या वाट्याला 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ महायुतीत कोणाला जाणार यावरून ओढाताण सुरू होती. शिवसेना शिंदे गट ही जागा लढवण्यासाठी आग्रही होता. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी प्रचाराची सुरूवातही केली होती. शिवाय त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला होता. मात्र त्याच वेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या पदरात निराशा पडली आहे. शिवाय आणखी एक हक्काचा मतदार संघही हातून गेला आहे. 
     
नारायण राणे 19 एप्रिलला अर्ज भरणार
नारायण राणे यांना उमेदवारी दाखल झाल्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाईल. राणे यांनी या आधीच उमेदवारी अर्ज घेतला आहे. 

अमित शहा यांची रत्नागिरीत सभा 
अमित शहा यांची 24 एप्रिलला रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. यासभे आधी भाजपने राणे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या रत्नागिरीत सुरू आहे. मोठी गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा महायुतीचा प्लॅन आहे. या सभेमुळे मतदार संघातील एकूणच माहोल बदलेल अशी चर्चा सुरू झाली आहे. राणेंनाही या सभेनंतर मोठी ताकद मिळेल. 

सामंत यांची माघार 
राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, किरण सामंत यांनी बंधु उदय सामंत यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली. यात त्यांनी आपण माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. शिवाय राणेंना निवडून आणण्यासाठी संपुर्ण मदत करण्याचे आश्वासन ही दिले. सध्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे. पण राजकारणातून नाही असे सुचक वक्तव्य करायलाही सामंत यावेळी विसरले नाही. अमित शहा, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा शब्द आपल्यासाठी शेवटचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

शिंदेंच्या हातून एक मतदार संघ गेला 
रत्नागिरी मतदार संघ हा तसा शिवसेनेचा मुळचा मतदार संघ. त्यामुळे तो शिंदेंना मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. हक्काच्या मतदार संघावर त्यांना पाणी सोडावे लागले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. या मतदार संघातीलही काही मतदार संघ हातून निसटण्याची भीती शिंदेंना आहे. 

Advertisement

Add image caption here