महिलांची अवहेलना करणारी राजकारण्यांची मालगाडी, सध्याचं स्टेशन मुंबई!

Arvind Sawant on Shaina NC : मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनाच चटका बसलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. संपूर्ण राज्यात निवडणूक प्रचाराला वेग आलाय. ऐन दिवाळीत प्रचाराचे फटाके फुटत आहेत. त्याचवेळी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनाच चटका बसलाय. दक्षिण मुंबईचे खासदार असलेल्या सावंत यांनी मुंबादेवीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उमेदवार शायना एन.सी. यांच्याबद्दल 'इम्पोर्टेड माल' हा आक्षेपार्ह शब्द वापरला. शायना एनसी यांनी त्याला 'महिला आहे, माल नाही' असं उत्तर दिलंय. त्यामुळे आगामी प्रचारात हा मुद्दा तापणार हे स्पष्ट झालंय.

काय म्हणाले सावंत ?

शायना एनसी यापूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. हा संदर्भ घेऊन सावंत यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांची अवस्था पाहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या. शिंदेंकडून तिकीट मिळालं. इथं इम्पोर्टेड चालणार नाही. इम्पोर्टेड माल इथं चालत नाही. आमच्या इथं ओरिजन माल चालतो, असं वक्तव्य सावंत यांनी मुंबादेवीचे काँग्रेस उमेदवार अमीन पटेल यांच्या प्रचारात केलं.

( नक्की वाचा : मुंबईत 20 टक्के मुस्लीम पण तिकीट देण्यात कंजुषी का? बड्या नेत्याची नाराजी, MVA ला फटका बसणार? )

पहिले राजकारणी नाही

महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणारे अरविंद सावंत हे पहिलेच राजकारणी नाहीत. त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील मुख्य सहकारी असलेल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही महिला नेत्याबद्दल माल हा शब्द जाहीर सभेत वापरला होता.

Advertisement

मध्य प्रदेशातील मंदसौरमधील एका जाहीर सभेत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या खासदार मिनाक्षी नटराजन यांचं वर्णन सौ टंच माल असं केलं होतं.  दिग्विजय सिंह यांनी जाहीर सभेत बोलताना स्वत:चं वर्णन राजकारणातील जुना रत्नपारखी असं केलं होतं. 'कोण बनावट आहे, कोण अस्सल आहे, हे मला माहिती आहे. या भागाच्या खासदार मिनाक्षी नटराजन या सौ टंच माल आहेत.' असं दिग्विजय सिंह म्हणाले होते. हे भाषण व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. आपल्या बोलण्याचा अर्थ शंभर नंबरी शुद्ध सोनं असा आहे, असं स्पष्टीकरण सिंह यांनी दिलं.

( नक्की वाचा : 'मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जीना', भाजपा नेत्याची खरमरीत टीका )

शायनांच्या पक्षातही तसेच नेते

मुंबादेवीच्या उमेदवार शायना एनसी यांनी सध्या 'महिला आहे माल नाही', हा मुद्दा प्रचारात उपस्थित केला आहे. त्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे नेते आणि सध्या दिंडोशीचे उमेदवार असलेले संजय निरुपम यांनी देखील महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

Advertisement

महिलांना आरक्षण पण....

संसदेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत मंजूर झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याची अंमलबजावणी होणार आहे. महिलांना प्रतिनिधित्व देण्याची एक मोठी मागणी यामुळे मान्य झालीय. पण, राजकारण्यांकडून महिलांना प्रत्यक्षात किती सन्मान मिळेल हा प्रश्न कायम आहे? राजकीय वादविवादामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणारी राजकारण्याची मालगाडी अद्यापही सुरुच आहे. या मालगाडीनं सध्याचं स्टेशन मुंबई आहे, हे अरविंद सावंत यांच्या वक्तव्यानं सिद्ध झालं आहे.