- नवी मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे
- खासदार श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केली, त्यावर नाईकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले
- गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना शांत झोप लागत नाही अशी टिका केलीय.
राहुल कांबळे
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आता रंगत येवू लागली आहे. आरोप प्रत्यारोपांनी तर टोक गाठलं आहे. या निवडणुकीत महायुतीतलेच दोन पक्ष आमने सामने उभे ठाकले आहेत. गणेश नाईक याच्या नवी मुंबईतल्या साम्राज्याला सुरूंग लावण्यासाठी एकनाथ शिंदे सरसावले आहेत. त्यांनी पूर्ण ताकद नवी मुंबईत झोकून दिली आहे. त्यामुळे इथं दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. टीका करण्याची एक ही संधी ते सोडत नाहीत. नुकतीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही नवी मुंबईत सभा घेतली. यावेळी त्यांनी वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला नाईक यांनी ही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वातावरण तंग झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईक यांनी जोरदार आणि आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. दिलेलं आव्हान हरलो, तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन, असंही नाईक म्हणाले आहेत. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतात अशी टीका गणेश नाईक यांच्यावर केली होती. शिवाय शिंदे हे इडीला घाबरतात. त्यावर नाईक हे काय इडीचे अधिकारी आहेत का असा प्रतिप्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर नाईक बोलत होते.
यावर बोलताना नाईक म्हणाले, “माझं वय झालं आहे, असा आरोप केला जातो. पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग. अर्धा तास तरी चालतात का ते पाहू,” असा टोला नाईक यांनी डॉक्टर असलेल्या श्रीकांत शिंदेंना लगावला. “मी कितीही फिरलो तरी मला रस्त्यात चक्कर येत नाही. रात्री शांत झोप लागते. झोपण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. मात्र तुमच्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात,” असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. त्यामुळे त्या गोळ्या कसल्या असा प्रश्न ही आता सर्वांनाच पडला आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या वयावरून टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर नाईकांनी हे प्रत्युत्तर दिल्याचं स्पष्ट होत आहे. घणसोली येथे उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून शिंदे-नाईक वादाला नवं वळण मिळालं आहे. दरम्यान गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचे जुने वैर आहे. त्यात आता शिंदे यांनी वेळ आल्यावर गणेश नाईक यांच्याबाबत बोलेन. आता काही बोलणार नाही अशी प्रतिक्रीया दिली आहे.