- रोड शो दरम्यान नवनीत राणा अचानक प्रचाराच्या गाडीतून उतरून युवा स्वाभिमानच्या प्रचाराला सुरुवात केली
- नवनीत राणा भाजपसोबत प्रचार करत असतानाच पती रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठीही प्रचार करत आहेत
- अमरावती महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाने भाजपविरोधात 32 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत.
शूभम बायस्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अमरावतीमध्ये निवडणुकीसाठी रोड शो झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूलाच नवनीत राणा होत्या. मात्र जसजसा हा रोड शो पुढे सरकला आणि साईनगर प्रभागाजवळ पोहोचताच नवनीत राणा प्रचाराच्या गाडीतून उतरल्या आणि गायाब झाल्या. इतका वेळ नवनीत राणा भाजप नेत्यांबरोबर होत्या. पण पुढच्या काही मिनिटांतच त्यांनी साईनगरमध्ये जाऊन युवा स्वाभिमानच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. हेच ते सध्या अमरावतीमध्ये गाजणारं राजकारण. नवनीत राणा एकीकडे भाजपबरोबर आहेत आणि दुसरीकडे त्यांचे पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाबरोबरही आहेत
अमरावती महापालिका निवडणुकीत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं 32 ठिकाणी भाजपविरोधात उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात साईनगर प्रभागातून राणांनी उमेदवार दिला आहे. याच तुषार भारतीय यांनी विधानसभा निवडणुकीत रवी राणांविरोधात उभं राहून आव्हान दिलं होतं. तुषार भारतीय नक्की विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. एकीकडे फडणवीसांबरोबर प्रचार करणाऱ्या नवनीत राणा दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाचाही प्रचार करत आहेत. त्यामुळे भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत.
अमरावतीत राणांचं राजकारण असं तळ्यात मळ्यात असताना त्यांना डिवचण्याची आयती संधी बच्चू कडूंनी साधली आहे. तुषार भारती हे भाजपविरोधात उभे होते असं बच्चू कडू म्हणाले. खरं तर बायको भाजपमध्ये असताना हे वाद मिटू शकत नाहीत. स्वाभिमानच्या पोस्टरवर नवनीत राणाचा फोटो नाही याचे आभारच मानले पाहीजेत अशी खोचक टीका कडू यांनी केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकीतही असाच भाजप विरुद्ध राणांची युवा स्वाभिमान असा संघर्ष रंगला होता. राणांच्या युवा स्वाभिमानमुळे भाजपचे 5 नगरसेवक पडले.
अचलपूरला किमान 5 नगरसेवक बीजेपीचे राहिले असते. मात्र युवा स्वाभिमान उभी असल्यामुळे नवनीत राणांसाठी काम करणारे पाच नगरसेवक पाडले. याला म्हणतात स्वाभिमान. त्यामुळे राणांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय दुसरीकडे राणांविरोधात कट्टर विरोधक यशोमती ठाकूरही मैदानात उतरल्या आहे. न शिकलेली बाई तिने हनुमान चालीसा अजून म्हणून दाखवली नाही. अशी टीका ठाकूर यांनी केली आहे. त्या ऐवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी आणखी खडे बोल राणा यांना सुनावले आहेत.
नवनीत राणा या काँग्रेसच्या पाठिंब्याने जिंकल्या होत्या याची आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेसमधून गेल्यावर त्या हिंदू शेरनी झाल्या. नवनीत राणा पक्ष म्हणून भाजपच्या बाजूनं प्रचार करणार की पत्नीधर्म म्हणून युवा स्वाभिमानची साथ देणार, याची चर्चा अमरावतीत रंगली आहे.पण राणांच्या या राजकारणामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. नवनीत राणांनी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवल्यानं अमरावतीत भाजपचा बट्ट्याबोळ होणार की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.