- तेजस मोहातुरे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी नाना पटोले यांना जागावाटप, प्रचाराची रणनिती, जाहीरनामा, प्रत्यक्ष प्रचार अशा प्रत्येक बाबतीत प्रदेशाध्यक्ष म्हणून जातीने लक्ष घालावे लागले होते. नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांना राज्यभर फिरावं लागत असल्याने स्वत:च्या मतदारसंघात प्रचारासाठी पुरेसा वेळ देता येत नाहीये. यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्यासाठी प्रचारात उतरण्याचं ठरवलं आहे. नाना पटोले यांची कन्या प्रिया पटोले यांनी यात जातीने लक्ष घातले असून त्यांनी मतदारसंघात जिथे जाणं शक्य होईल तिथे जाऊन वडिलांसाठी मते मागण्यास सुरुवात केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रिया पटोले त्यांचे वडील नाना पटोले यांच्यासाठी प्रचार करत असताना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला मते द्या असे म्हणत मतांचा जोगवा मागत आहेत हे विशेष. एक प्रकारे प्रिया पटोले (Priya Patole) यांनी आपल्या वडिलांना मुख्यमंत्री बनविण्याचा चंगच बांधला असल्याचे यातून दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते, खासकरून विदर्भात काँग्रेसला आपला आलेख उंचावण्यात विशेष यश आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. 100 हून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जास्त जागा लढवत असल्याने इतर मित्र पक्षांपेक्षा काँग्रेसला जास्त जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशी स्थिती निर्माण झाल्यास काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकते.
(नक्की वाचा: अशी ही पळापळ! 1 महिन्यात 3 पक्षात प्रवेश, 2 वेळा खासदार असलेल्या नेत्यानं असं का केलं?)
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या प्रबळ दावेदारांमध्ये बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. लोकसभेनंतर विधानसभेतही उत्तम कामगिरी केल्यास त्याचे बक्षीस नाना पटोले यांना मिळू शकते असा दावा केला जात आहे. अर्थात सध्यातरी या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रिया पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करा असे म्हणत प्रचार करणे हे नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदात असलेला रस अधोरेखित करणारे ठरते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
वडिलांसाठी प्रचारात उतरलेल्या लेकी
- अंकिता हर्षवर्धन पाटील
- पूर्वा दिलीप वळसे पाटील
- जयश्री थोरात
- शिवानी वडेट्टीवार
- श्रीजया चव्हाण
- प्रिया सदा सरवणकर