- पुणे महापालिका निवडणुकीसाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या मताचा हक्क बजावला आहे
- अभिनेता सुबोध भावे यांनी पुण्याच्या विकासावर टीका करत सिमेंटच्या जंगलामुळे शहराचा गळा घोटला जातो असं म्हटले
- भावे म्हणाले की मुलांसाठी खेळण्याची जागा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोकळी जागा कमी होत आहे
पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज अनेक जण मतदान करत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हे पुण्यात राहतात. त्यांनी ही आपल्या मताचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने आपल्या सडेतोड वक्तव्याने पुणेकरांना विचार करायला भाग पाडलं आहे. पुणे शहराच्या बदलत्या स्वरूपावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "शहराचा गळा घोटून विकास होत नसतो," अशा शब्दांत त्याने प्रशासकीय धोरणांवर सडेतोड टीका केली. त्याच्या या वक्तव्याची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. तो आपल्या कुटुंबासह मतदानाला पोहचला होता.
पुण्यात विकासाच्या नावाखाली सिमेंटचे जंगल उभारले जात असल्याचं सुबोध भावे म्हटलं आहे. पुढे तो म्हणाला की, पुण्यातील परिस्थिती आता मुंबईपेक्षा अधिक गंभीर होत चालली आहे. जिथे 3 मजली इमारती होत्या, तिथे आता 27 मजल्यांचे टॉवर उभे राहत आहेत. पण या विकासात सामान्य माणसाचा विचार कुठे आहे? मुलांसाठी खेळायला मैदाने नाहीत आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी मोकळी जागा उरलेली नाही. केवळ इमारती उभ्या करणे म्हणजे विकास नव्हे, असे त्याने स्पष्ट केले. या विकासाबाबत त्याने आपली नाराजी लपवली नाही.
नागरिकांच्या दबाव गटाची गरज ही त्याने यावेळी व्यक्त केली. राजकारण्यांवर निशाणा साधताना सुबोधने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणाला, "दुर्दैवाने आपल्याकडे नागरिकांचा कोणताही प्रभावी दबाव गट नाही. जोपर्यंत नागरिक एकत्र येऊन जाब विचारत नाहीत, तोपर्यंत राजकारणी फक्त आश्वासनेच देत राहतील. मतदान करणे हे केवळ कर्तव्य नसून, निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या कामावर लक्ष ठेवणे ही देखील आपली जबाबदारी असल्याचे त्याने नमूद केले. शिवाय त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचं तो म्हणाला.
ग्राउंड द्या, मेट्रो नको असं ते म्हणाले. विकासाचे मापदंड बदलण्याची गरज व्यक्त करताना सुबोधने सांगितले की, सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा आणि मैदाने उपलब्ध करून द्यावीत. "जर काही फुकट द्यायचे असेल, तर मुलांना खेळायला मैदाने द्या," असा टोलाही त्याने लगावला. या निवडणुकीत ही लाडकी बहीणी योजनेचा मुद्दा गाजत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी लाडक्या बहीणीचा हफ्ता त्यांच्या खात्यात जमा झाला. त्या पार्श्वभूमीवर तर भावे याने हे वक्तव्य केले नाही ना याची ही चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. पण समझने वाले को इशारा काफी होता है असं काहींनी त्याच्या प्रतिक्रीयेवर म्हटले आहे.