- मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत भाजपमध्ये प्रवेश केला
- बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही युती होणार नाही असे स्पष्ट केले आहे
- महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय यांचा समावेश असून राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे महायुतीत नाही
सूरज कसबे
महापालिका निवडणूका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुण्याच्या मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. त्यानंतर आज भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नसल्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. महायुतीची पहिली उमेदवार यादी ही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे इथं महायुतीत राष्ट्रवादी नसणार हे स्पष्ट आहे.
शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय सोबत भाजप मैदानात उतरणार आहे. मावळ तालुक्यात आता निवडणुकीपूर्वीच महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट आणि निर्णायक राजकीय लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळच्या राजकारणात ही केवळ पक्षांतराची घटना नाही, तर ती अस्तित्वाची लढाई असल्याचा ठाम दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून, घराणेशाही बळावत असल्याचा आरोप प्रशांत भागवत यांनी केला. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षाला ही रामराम केला.
संविधानाने प्रत्येकाला पर्याय निवडण्याचा अधिकार दिला आहे. न्याय मिळत नसेल तर निर्णय घेणं अपरिहार्य ठरतं.राष्ट्रवादीवर नाराजी म्हणून नव्हे, तर पक्षाकडून दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेक वर्षे प्रामाणिक पणे काम केल्यानंतरही अपेक्षित निर्णय न झाल्याने पुढील वाटचालीचा विचार करावा लागला, असं भागवत यांचं म्हणणं आहे. इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातून मेघा भागवत या प्रबळ दावेदार होत्या. त्यांनी आपली तयारी ही पूर्ण केली होती. मात्र त्यांच्या उमेवारीबाबत संभ्रम कायम ठेवण्यात आला. हे योग्य नव्हते असं ही भागवत यावेळी म्हणाले.
अखेर कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. कालपर्यंत त्या पक्षात होतो. त्यामुळे आता तिकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही,असं त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय वैयक्तिक नव्हे तर कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी घेतल्याचं भागवत यांनी ठामपणे मांडलं आहे. दरम्यान भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मावळ तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी ही उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदेचे मावळ तालुक्यातील उमेदवार
- इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गट :
- मेघा भागवत
पंचायत समिती गणनिहाय उमेदवार :
- इंदोरी – श्रीकृष्ण भेगडे
- वराळे – रवींद्र शेटे
- चांदखेड – सुवर्णा घोटकुले
- उर्से – बाळासाहेब पारखी
- काले – सीमा ठाकर
- कार्ला – रंजना गायकवाड
- टाकवे – अश्विनी सोमनाथ कोंडे ( शिवसेना शिंदे गट )