काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला. रायबरेलीत 20 मे रोजी मतदान होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (3 मे) राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून अर्ज भरला. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते प्रियांका गांधी-वाड्रा, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यावेळी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी अर्ज भरल्यावर सोशल मीडिया साईट X वर एक भावुक पोस्ट लिहिली असून खास व्हिडिओ देखील शेअर केलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हंटलंय की, 'रायबरेलीमध्ये अर्ज भरणं हा माझ्यासाठी भावुक प्रसंग होता. माझ्या आईनं मला मोठ्या विश्वासानं कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आहे. या कर्मभूमीची सेवा करण्याची संधी दिलीय. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळं नाही. दोन्ही माझं कुटुंब आहे. मला आनंद आहे की 40 वर्षांपासून या परिसराची सेवा करणारे किशोरी लालजी अमेठीचं प्रतिनिधित्व करणार आहेत. अन्यायाच्या विरोधात सुरु असलेल्या या न्यायाच्या लढाईत मी माझ्या माणसांकडून प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद मागत आहे. मला विश्वास आहे की, राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत तुम्ही माझ्यासोबत उभे आहात.'
रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांवर गांधी कुटुंबातील कोणीतरी निवडणूक लढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. प्रियांका गांधी वाड्रा पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरतील अशीही चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात प्रियांका यांनी निवडणूक लढवण्याचे टाळले आहे. तर राहुल गांधी यांनी अमेठीच्या ऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
( नक्की वाचा : "घाबरून पळू नका", राहुल गांधींच्या रायबरेलीतून निवडणूक लढण्यावरुन PM मोदींचा टोला )
रायबरेलीतून भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठीतून स्मृती इराणी मैदानात आहेत. अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदार संघ गांधी कुटुंबाचे गड मानले जात होते. पण, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता.