लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शनिवार आणि रविवार पाहून राजकीय पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. आजही प्रमुख नेते महाराष्ट्राच्या मैदानात प्रचारासाठी उतरणार आहेत. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, शिवसेनेचे संजय राऊत, वंचितचे प्रकाश आंबेडकर, शिवसेना शिंदे गटाकडून अभिनेता गोविंदा प्रचाराचा धुरळा उडवून देणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस सभांनी गाजणार हे निश्चित आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी भंडाऱ्यात
राहुल गांधी भंडाऱ्यात जाहीर सभा घेणार आहे. त्यांची ही सभा दुपारी तीन वाजता होणार आहे. यासभेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित रहाणार आहेत. याच मतदार संघात भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांची सभा झाली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह इंडीया आघाडीवर जोरदार टिका केली. भ्रष्टाचारी म्हणून त्यांचा उल्लेख केला. त्याला राहुल गांधी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गडकरी, फडणवीस, बावनकुळे एकाच मंचावर
नागपूर आणि रामटेकमध्ये महायुतीकडून जाहीर सभांचे आयोजन केले आहे. या सभामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करतील. तर नीलम गोऱ्हे या रामटेकमध्ये युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. नागपूरातली गडकरींची सभा संध्याकाळी साडेपाच वाजता होईल.
राणे - राऊत कोकणात
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्गमध्ये असणार आहे. वेंगुर्ल्यात ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात असल्याने त्यांनी मतदार संघात सभांचा धडाका लावला आहेत. तर त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले विनायक राऊत हे रत्नागिरीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
प्रकाश आंबेडकर वर्ध्यात
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे वर्ध्यात आज महाएल्गार सभा घेत आहेत. या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि वंचितचे उमेदवार इथे मैदानात आहेत. आंबेडकरांनी ही जागा जिंकता यावी यासाठी जोर लावला आहे. या सभेत आंबेडकर मोदींना लक्ष्य करतात की काँग्रेसला याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अभिनेता गोविंदाही प्रचाराच्या मैदानात
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री महल्ले पाटील या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा येणार आहे. गोविंदा सकाळी रोड शो करणार आहे. तर दुपारी कांरजा इथे जाहीर सभा घेणार आहे.
संजय राऊत संभाजीनगरमध्ये
महाविकास आघाडीचे संभाजीनगर लोकसभेचे चंद्रकांत खैरे साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख, शिवसेना प्रवक्ता खासदार संजय राऊत, राजेश टोपे उपस्थित राहाणार आहेत.