Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीवर मोहर, पण.. 'या' कारणांमुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली

Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या बुधवारी (24 डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची अखेर घोषणा झाली आहे.
मुंबई:

Raj-Uddhav Thackeray Alliance :  महाराष्ट्राच्या राजकारणात अखेर, 'तो ऐतिहासिक क्षण' आला ज्याची प्रतीक्षा शिवसैनिक आणि मनसैनिक अनेक वर्षांपासून करत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी वीस वर्षांनंतर एकत्र येत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही एकत्र आलोय आणि ते कायम एकत्र राहण्यासाठीच, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर राज ठाकरे यांनीही आता युती झाली आहे, असे जाहीर केले. या ऐतिहासिक भेटीमुळे मुंबईसह राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे चित्र आता पूर्णपणे पालटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण त्याचवेळी ठाकरे बंधूंच्या बुधवारी (24 डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत. 

मुंबई महापालिकेसाठी नवा मास्टरप्लॅन

ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी लढाई आता पूर्णपणे सेट झाली आहे. ही लढत प्रामुख्याने मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्द्यावर रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईसोबतच नाशिक आणि राज्यातील इतर 9 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू आता एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 150 ते 170 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर राज ठाकरे यांच्या मनसेला 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय त्यांच्या सोबत असलेल्या इतर सहकारी पक्षांना 40 ते 50 जागा दिल्या जाऊ शकतात.

( नक्की वाचा : Nagarparishad Result 2025 : मुंबईच्या मोहात ठाकरेंनी बालेकिल्ले गमावले; नगरपालिका निकालातून धोक्याची घंटा )

महापालिकांच्या युतीवर शिक्कामोर्तब

इतर महापालिकांमध्येही युती कशा पद्धतीने काम करेल, यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Advertisement

मात्र, या युतीच्या घोषणेसोबतच अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, ज्यातील काहींची उत्तरे मिळाली असली तरी अनेक तांत्रिक बाबी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. विशेषतः जागावाटपाचा ठोस आकडा जाहीर न केल्यामुळे राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

(नक्की वाचा : BMC Election 2026 : मुख्यमंत्रीपदापेक्षाही बीएमसीची खुर्ची मोठी? अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा मुंबईची माया भारी )

जागावाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली असली तरी जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, कोण किती जागा लढणार याची घोषणा सध्या केली जाणार नाही. 

Advertisement

नेमक्या किती आणि कोणत्या महानगरपालिकांमध्ये ही युती पूर्ण ताकदीने उतरणार, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच मराठी अस्मितेचा मुद्दा सोडला तर इतर कोणत्या विकासकामांवर किंवा प्रश्नांवर ही युती प्रचार करणार, हे देखील अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरे अद्याप प्रलंबित

राजकीय समीकरणांचा विचार करता, काँग्रेसने आधीच स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, त्यावर अधिक भाष्य करणे ठाकरे बंधूंनी टाळले. तसेच शरद पवार यांच्यासोबत जाण्याबाबतची भूमिकाही स्पष्ट करण्यात आलेली नाही. 

Advertisement

ठाकरे बंधू भविष्यात एकत्रित सभा किती आणि कुठे घेणार, याबाबत कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित ठेवूनच ही पत्रकार परिषद पार पडली. 

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 तारखेपासून सुरू झाली असल्याने, आता उमेदवारांना मिळणाऱ्या AB फॉर्मवरूनच कोणती जागा कोणाकडे गेली, हे स्पष्ट होणार आहे.