भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्या प्रमाणात पैसा वाटत आहेत. शिवाय सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरारमध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. पैसे वाटण्याचे हे प्रकरण मतदानाच्या एक दिवस आधीच गाजत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरु आहे असा आरोप रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. वसई विरार येथे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडल्याचा दावा होत आहे. घटनास्थळी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून 10 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे असे चेन्नीथला म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - हा 'नोट जिहाद' आहे का? ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल
पण अद्याप तावडे यांना अटक केली नाही. प्रचार संपल्यानंतर नियमानुसार मतदारसंघाच्या बाहेरची व्यक्ती त्या मतदार संघात थांबू शकत नाही. पण तावडे यांनी वसई विरारला जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामुळे त्यांनी स्वतःच आचारसंहिता भंग केल्याचे मान्य केले आहे. प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती व प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. असे चेन्नीथला म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?' ठाकूरांचे गंभीर आरोप
फक्त वसई विरारच नाही तर राज्यभरात भाजपा आणि महायुतीकडून पैसे वाटून जनमत विकत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यभरात सुरु असलेल्या पैसे वाटपावर कारवाई करून पैसे वाटणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसे केलं तरच निष्पक्ष निवडणुका पार पडतील असे चेन्नीथला म्हणाले. तावडे यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय त्यांना चारही बाजूने घेरले आहेत. त्यामुळे तावडे यांची डोकेदुखी वाढली आहे.