रावेर लोकसभा : एकनाथ खडसेंच्या घरवापसीचा सुनेला फायदा?

एकनाथ खडसे यांनी घरवापसीची घोषणा केल्यानं भाजपाची डोकेदुखी कमी झाली आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
रावेर लोकसभा मतदारसंघावर 2009 पासून भाजपाचं वर्चस्व आहे.
रावेर:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

 मतदारसंघाच्या फेररचनेतून 2009 साली रावेर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या निर्मितीपासून या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व आहे. 2009 साली झालेल्या निवडणुकीत हरिभाऊ जावळे विजयी झाले होते. त्यानंतर गेली दोन टर्म ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. 2019 नंतर राज्यातल्या राजकारणासह रावेर मतदारसंघातील परिस्थिती देखील बदलली. रावेरवर वर्चस्व असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला गंभीर आव्हान निर्माण होणार अशी परिस्थिती होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये परतणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे भाजपाची मोठी डोकेदुखी कमी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी रावेरमध्ये निवडणूक होणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रावेर मतदारसंघाचा इतिहास

देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1952 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघाचं नाव भुसावळ होतं. काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब शिवराम राघो राणे 1952 साली विजयी झाले होते. त्यानंतर वाय. सी. महाजन यांनी  मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले. त्यानंतरच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची जळगाव जिल्ह्यात प्रमुख नेतृत्व होतं. त्यामुळे मतदारसंघावरही काँग्रेसची पकड होती. काँग्रेसच्या या वर्चस्वाला भाजपाकडून पहिल्यांदा गुणवंतराव सरोदे यांनी आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव निर्माण केला. 

मागील निवडणुकीत काय झालं?

देशात मोदी फॅक्टर आणि जळगावमध्ये खडसेंचं वर्चस्व याचा फायदा गेल्या दोन निवडणुकीत रक्षा खडसे यांना झाला. 2014 मध्ये रक्षा खडसे यांनी  6 लाख 5 हजार 64 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिष जैन यांनी 2 लाख 87 हजार 271 मतं मिळाली होती.  2019 मधील निवडणुकीत खडसे यांना 6 लाख 52 हजार 212 मतं मिळाली. तर त्यांच्या जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 18 हजार 740 मतं मिळाली. 

Advertisement

( नक्की वाचा : जालना लोकसभा : रावसाहेब दानवे विजयाचा षटकार लगावणार का? )
 

अंतर्गत नाराजी 

रावेर लोकसभा मतदारसंघात लेवा पाटीदार, गुजर आणि मराठा समाजाचं प्राबल्य आहे.  एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महायुतीमध्ये असूनही रक्षा खडसेंना विरोधाचा सामना करावा लागतो. सध्या निवडणुकीच्या निमित्तानं चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे यांच्यात दिलजमाई झाल्याचा दावा केला जात आहे. 

Advertisement

महाविकास आघाडीमध्येही सर्व आलबेल नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं श्रीराम पाटील हे नवोदीत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. श्रीराम पाटलांच्या उमेदवारीवरून माजी आमदार संतोष चौधरींचे नाराजीनाट्य हा चर्चेचा विषय ठरला होता. सध्या ही नाराजी दूर झाली असल्याचं सांगितलं जातंय. दोन्ही प्रमुख उमेदवार अंतर्गत नाराजीचं आव्हान कसं परतवणार यावरही निवडणुकीचं अवलंबून असेल. 

Advertisement

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन रिंगणात उतरले आहेत तर श्रीराम पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा रावेर लोकसभा मतदारसंघात झाल्या. वंचित बहुजन आघाडीनं संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्याचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या आहेत. 

( नक्की वाचा : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा? )
 

रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न आणि आश्वासनं

जळगाव जिल्ह्यात केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. केळी उत्पादकांचे प्रश्न या मतदारसंघातील प्रमुख मुद्दा आहे. केळीवर आधारित उद्योग व्यवसाय, एमआयडीसी आणि स्थानिक बेरोजगारांचे प्रश्नही निवडणुकीत चर्चेत आहेत. त्याचबरोबर बोदवड सिंचन योजनेचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 

या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी करण्याचा संकल्प केलाय. ग्रामीण भागातील घरकुल योजना, महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज, शेतकऱ्यांसाठी विविध योजना तसेच केळी उत्पादकांसाठी क्लस्टर उभे करण्यासाठी मदत करणार असल्याचं आश्वासन रक्षा खडसे यांनी दिलंय.  

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आपण राजकारणात सत्ता भोगण्यासाठी नाही तर जनतेचं देणं लागतो म्हणून उतरल्याचा दावा केलाय. या मतदासंघात गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही प्रोजेक्ट किंवा नवीन प्रकल्प आलेला नाही. तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांचे प्रश्नही जैसे थे असून ते सोडवणार असल्याचं आश्वासन पाटील यांनी दिलंय.  

( नक्की वाचा :  बीड लोकसभा : मुंडेंच्या गडाला पवार हादरा देणार का? )
 

भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, मलकापूर या शहरांना स्मार्ट सिटीमध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करणे, मतदारसंघातील सुमारे साडेतीन लाख कामगारांना अधिकृत मजूर म्हणून सरकारकडून मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी केलीय. 

एकनाथ खडसे यांच्या पक्षत्यागानंतरही भाजपानं पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. सूनेला उमेदवारी मिळताच खडसे यांना जुने दिवस आठवले आणि त्यांनी घरवापसीची घोषणा केली. खडसे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांच्या घरवापसीचा भाजपाला किती फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.