जाहिरात
Story ProgressBack

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा?

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात यंदा 3 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होत आहे.

Read Time: 4 mins
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhaji Nagar Aurangabad lok sabha election 2024 : मराठवाड्याची राजधानी अशी छत्रपती संभाजीनगर शहराची आजची ओळख असली तरी ती पहिली ओळख नाही. हे शहर यादव कालखंडात देशाच्या केंद्रस्थानी होतं.अजिंक्य समजला जाणारा देवगिरीचा किल्ला या भागाच्या गौरवशाही परंपरेची साक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यामुळे प्राप्त झाली. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचं हे शहर केंद्र होतं. मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ या मतदारसंघाचे खासदार होते.  मुंबईबाहेर शिवसेना इथंच पहिल्यांदा रुजली. शरद पवारांनी 1986 साली काँग्रेसमध्ये परतण्यासाठी याच शहराची निवड केली. देशात आणि महाराष्ट्रात 2019 साली मोदी लाट असताना याच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघानं धक्कादायक निकाल दिला.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

5 वर्षापूर्वीचा धक्का

छत्रपती संभाजीनगरमध्ये 1989 ते 2019 या 3 दशकांमध्ये 1998 च्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना-भाजपा युतीचा खासदार निवडून आला होता. मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे या शिवसेना खासदारांनी शहराचं प्रतिनिधित्व केलं. चंद्रकांत खैरेंनी 1999 पासून सलग चार निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

2019 मध्ये मात्र खैरेंना चौरंगी लढतीला सामोरं जावं लागलं. 'खान विरुद्ध बाण'या नेहमीच्या मांडणीच्या पलिकडं त्या निवडणुकीत मतदान झालं. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात मोदींची लाट होती. मराठवाड्यातील इतर 7 जागा भाजपा-शिवसेना युतीनं जिंकल्या. पण, संभाजीनगर मतदारसंघातील लढत अगदी शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची झाली. 

चौरंगी लढतीमध्ये ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षाच्या इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंवर 4492 मतांनी निसटता विजय मिळवला. AIMIM पक्षाच्या 9 दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच हैदराबाद शहराच्या बाहेर त्यांचा खासदार निवडून आला. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पावणे तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर काँग्रेसचे सुभाष झांबड सुमारे 90 हजार मतं मिळवून  चौथ्या क्रमांकावर राहिले. 

( नक्की वाचा : बीड लोकसभा : मुंडेंच्या गडाला पवार हादरा देणार का? )
 

5 वर्षांत काय बदललं ?

गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बदललेल्या परिस्थितीचं प्रतिबिंब छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटलं आहे. या शहराचं औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं आता झालं आहे. उद्धव ठाकरे सरकारनं अगदी शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला. त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनं हा निर्णय पुढं नेला. आता मुंबई उच्च न्यायालयानंही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

शहराचं नाव बदललं तसंच शिवसेनेतही मोठा बदल झालाय. शिवसेनेच्या फुटीनंतर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्याच गटात आहेत. पाच लोकसभा निवडणुका खैरे ज्यांच्या विरोधात लढले त्या काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांना यंदा पाठिंबा आहे. तर खैरेंचे जुने सहकारी संदीपान भुमरे हे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हासह खैरेंच्या विरोधात लढत आहेत.

इम्तियाज जलिल यांना गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीचा मोठा फायदा झाला होता.यंदा वंचित जलील यांच्यासोबत नाही. वंचितकडून अफसर खान हे मुस्लीम उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे जलील यांच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे.या परिस्थितीमध्ये जलील यांच्यासमोर आजवर एकदाही निवडणूक न हरण्याचा रेकॉर्ड वाचवण्याचं मोठं आव्हान आहे.

महायुतीकडून एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भुमरे यांचा पैठण हा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही. त्यामुळे त्यांना हक्काची मतं मिळणार नाहीत. भुमरे यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभव असला तरी लोकसभा निवडणुकीचा अनुभव नाही. त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे त्यांना कमी कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे.

(नक्की वाचा : रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं? )
 

मराठा फॅक्टर

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्याचं राजकारण गेल्या वर्षभरात ढवळून निघालं आहे.जरांगे ज्या अंतरवाली सराटी गावातून आंदोलन करत होते ते अंतरवाली सराटी गाव संभाजीनगरपासून काही तासांच्या अंतरावर आहे. गेली अडीच वर्ष जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलेल्या संदीपान भुमरे यांचे जरांगे यांच्याशी उत्तम संबंध आहेत. त्याचा फायदा भुमरेंना होऊ शकतो. 

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची मत 21 ते 22 टक्के आहेत. तर अनुसुचित जाती-जमातींची संख्या 19 ते 20 टक्के आहे.वंचितची सोबत नसताना जलील यापैकी किती मतं मिळवतात? महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर उभे असलेले खैरे मुस्लिम मतं किती मिळवणार यावरही या निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

( नक्की वाचा : माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार? )
 

पक्षीय बलाबल

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड, छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर  पश्चिम, छत्रपती संभाजी नगर पूर्व, गंगापूर आणि वैजापूर हे सहा मतदारसंघ येतात. त्यामधील कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. संभाजीनगर पश्चिम (संजय शिरसाठ), संभाजीनगर मध्य (प्रदीप जैस्वाल) वैजापूर (रमेश बोरनारे) हे तीन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. तर संभाजीनगर पूर्व (अतूल सावे) आणि गंगापूर (प्रशांत बंब) हे भाजपाचे आमदार आहेत.

कधी होणार मतदान?

छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर निकाल 4 जून रोजी जाहीर होईल.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
'मिंदे आणि भाजपला सांगतो षंढ नसाल तर....' उद्धव ठाकरे यांचं थेट चॅलेंज
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा?
Anil Desai will win in South Central Mumbai Lok Sabha or Rahul Shewale will do hat trick
Next Article
दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?
;