- सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना ठाकरे गटातील उमेदवाराच्या आईने विष घेतले.
- विष घेण्यामागे काँग्रेसच्या काही नेत्यांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे
- मुमताज गवंडी यांना सांगली शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
शरद सातपुते
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सगळीकडेच रणधुमाळी उडाली आहे. अशा वेळी सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वच जण हादरले आहेत. सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात असलेल्या उमेदवाराच्या आईन विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या मागचे कारण समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. शिवाय त्यामुळे एक हाय व्होल्टेज ड्रामाच सांगलीत अनुभवायला मिळाला आहे. त्यामुळे सध्या सांगलीत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सांगलीमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. एकीकडे सर्वजण प्रचारात व्यस्त असतानाच प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विष घेतले. त्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजकीय दबावातून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप होत आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केला आहे.
त्याचबरोबर अवैध धंदेवाले, समाजातील धर्मगुरू आणि काही समाज प्रतिनिधींनी सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. याच त्रासाला कंटाळून उमर गवंडी यांच्या आईने सकाळी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. हीबातमी वाऱ्या सारखी शहरात पसरली. त्यानंतर शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान या घटनेची कोणतीही नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात अद्यापही झाली नव्हती. रुग्णालयाबाहेर जमलेल्या शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात यावेळी जोरात वाद झाला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार ही घडला. पोलिसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगलीच्या प्रभाग 16 मधून शिवसेना ठाकरे पक्षाकडुन उमर गवंडी हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक हे निवडणूक लढवत आहे.गवंडी यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर काँग्रेसने कोणताही दबाव टाकला नव्हता असं काँग्रेस उमेदवार राजेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय सर्व आरोप ही फेटाळून लावले आहेत.