- मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या वाट्याला कमी जागा आल्या.
- मनसेच्या मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होऊ दिले गेले नाही
- मनसेची सर्व तिकीटं संजय राऊत यांनी ठरवल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केला
BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पण तिकीट वाटपावरून मनसेमध्ये धुसफूस दिसत आहे. मनसेच्या वाट्याला कमी जागा आल्याने राज ठाकरे यांचे एक-एक शिलेदार नाराज होत आहेत. त्यातील काहींनी पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे. त्या पैकीच एक राज ठाकरे यांचे खास विश्वासू माजी नगरसेवक संतोष धुरी. संतोष धुरी यांनी नाराज होत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते ही महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. शेवटी त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी NDTV मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांना दिलेल्या खास मुलाखतीत आपण पक्ष का सोडला याबाबतचे धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवाय मनसेची स्थिती या युतीत काय झाली आहे. उमेदवारी कुणी वाटल्या याचे ही स्फोटक खुलासे त्यांनी केले आहेत.
ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या वाट्याला जवळपास 53 जागा आल्या आहेत. सुरूवातील प्रत्येक विधानसभेत मनसेला कमीत कमी दोन जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही असा दावा संतोष धुरी यांनी केला आहे. जागा वाटपाच्या चर्चेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे कधीच नव्हते. ज्यावेळी ते मातोश्रीवर चर्चेसाठी गेले त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी तु आता कशाला आला आहेस. सर्व काही ठरलं आहे असं सांगितलं. त्यावर बाळा नांदगावकर यांनी ही सर्व ठरल्याचं सांगितलं. त्यामुळे या प्रक्रीयेत संदीप देशपांडे यांना कुठेही घेण्यात आलं नव्हतं असं ते म्हणाले. यावेळी नांदगावकर यांच्यावर धुरी यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्या जागा मनसेला मिळाल्या त्यावर उमेदवार कोण असावा हे राज ठाकरे किंवा अमित ठाकरे ठरवत नव्हते असा दावा ही धुरी यांनी केला आहे. मनसेमध्ये कोणाला तिकीट द्यायचं हे सामनातून ठरत होतं. मनसेची सर्व तिकीटं ही संजय राऊत यांनी ठरवल्याचा गौप्यस्फोट ही धुरी यांनी या मुलाखतीत केला आहे. संजय राऊत यांनीह मनसेची तिकीटं ठरवली असंही ते म्हणाले हे आपण जाहीरपणे सांगतो. वरळीमध्ये तर आम्हाला एकच जागा देण्यात आली. तिथला उमेदवारही संजय राऊत यांनी बदलायला लावला असा दावा त्यांनी केला. त्यांनी उमेदवार सुचवले आणि आम्ही ते दिले असं ही त्यांनी सांगितले. आमचा पक्ष कम्प्लिट सरेंडर झाला. राज ठाकरे सरेंडर झाले. आम्ही दादर, माहिम, वरळी, भांडूप, शिवडी याच भागात जागा मागत होते. मराठी भागात जागा मागत होतो. पण आम्हाला दिल्या नाहीत. त्यासाठी मातोश्रीचा नकार होता.
नक्की वाचा: BMC ELection 2026: संतोष धुरी स्वार्थी! वरळीत बसलेल्या धक्क्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
बाळा नांदगावकरांनी सर्वांना इमोश्नल ब्लॅकमेल केलं होतं. तेच जागा वाटपाच्या चर्चेत जात होते. ते सांगायचे दोन भाऊ एकत्र यायला पाहीजेत. मी बाळासाहेबांना तसा शब्द दिला आहे. मग तुमच्या शब्दासाठी तुम्ही पक्ष दावणीला बांधणार का असा प्रश्न ही संतोष धुरी यांनी या निमित्ताने केला. मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार यासाठी आमची तयारी होती. पण आता हे कुटुंब एकत्र येत आहे. कुटुंब म्हणून तुम्ही एकत्र या पण कार्यकर्त्यांचा तुम्ही काही विचार करणार आहात की नाही? मनसेची ताकद रस्त्यावर आहे असं राज ठाकरे सांगायचे. ती ताकद आम्हीच तर दाखवत होतो. आम्ही रस्त्यावरच होतो. अनेक केसेस अंगावर घेतल्या. कुटुंबापासून दुर राहीलो. त्याच कुठे तरी विचार व्हायला हवा होता की नाही असा प्रश्न ही त्यांनी केला.
आम्ही राज ठाकरेंबरोबर नेहमीच राहीलो. 2017, 2019,2023 मध्ये आपल्याला आणि संदीप देशपांडे यांना वेगवेगळ्या पक्षाकडून ऑफर होत्या. पण आम्ही कधीच पक्षाला सोडलं नाही. पण आता ती वेळ पक्षानेच आणली. ज्या आमच्या हक्काच्या जागा होत्या त्या मिळाल्या नाहीत. यशवंत किल्लेदारसाठी भांडून जागा पदरात पाडून घेतली तसं आमच्यासाठी करता आलं असतं पण तसं केलं गेलं नाही. मातोश्रीच्या सांगण्यावरून मला आणि संदीप देशपांडे यांना संपूर्ण प्रक्रीयेपासूनच लांब ठेवण्यात आलं असा आरोप ही त्यांनी केला. संदीप देशपांडेमध्ये सहनशक्ती आहे. त्यामुळे ते अजून पक्षात आहेत. पण आपल्याला सहन झालं नाही. त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. माहिमचे शिवसेना आमदार सध्या पैसे गोळा करण्यातच मशगूल असल्याचा ही आरोप त्यांनी केला. त्यांनी विरोधकांकडूनही पैसे घेतल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे.