शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी, जनता नेत्यासोबत की अभिनेत्यासोबत?  

कशी आहेत शिरूरची राजकीय गणिते?

जाहिरात
Read Time: 3 mins
पिंपरी चिंचवड :

प्रतिनिधी, सूरज कसबे

शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट आमने सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून डॉ.अमोल कोल्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ मुळचा खेड लोकसभा नावाने ओळखला जाणारा मतदान संघ 2009 साली विभाजन होऊन शिरूर लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड - आळंदी , भोसरी , हडपसर आणि शिरूर या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो.

मूळच्या शिवसेनेकडे असणाऱ्या या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विजय मिळवला. त्यावेळी नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात 58 हजार 486 मतांची आघाडी घेत विजयी झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने लोकप्रिय झालेल्या अमोल कोल्हे यांना  शिरूरकरांनी 2019 ला दिल्ली वारी घडवली. 

Advertisement

राज्यात झालेल्या सत्ता संघर्षाचा फटका या शिरूर लोकसभेला बसला आणि 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेल्या डॉ.अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या सोबत राहणे पसंत केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही जागा महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला सोडायला तयार नव्हता, अखेर मूळचे शिवसेना शिंदे गटाचे असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात जाहीर प्रवेश करत आपली उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन गटांमध्ये चुरशीची लढत असल्याचा पाहायला मिळतयं.

Advertisement

नक्की वाचा - कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?

काय आहेत या लोकसभा मतदार संघाचे प्रभावी मुद्दे.

* रांजणगाव ,चाकण एम आय डी सी मधील कामगारांचा रोजगाराचा प्रश्न.
* चासकमान कालव्याला सुरू असलेली गळती.
* कुकडी प्रकल्पाच्या पाण्याच्या वाटपाचा प्रश्न. 
* डिंबे भोगद्याला असलेला विरोध.
* पुणे - नगर आणि पुणे -  नाशिक महामार्गावर ते होणारी सततची वाहतूक कोंडी.
* इंद्रायणी नदी प्रदूषणात झालेली वाढ.
* इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प.


शिरूर लोकसभा मतदारसंघात असणारे विधानसभा मतदार संघ...

1) जुन्नर - अतुल बेनके ( राष्ट्रवादी अजित पवार ) 

2) आंबेगाव - दिलीप वळसे पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार ) 

3) खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार ) 

4) शिरूर - अशोक पवार ( राष्ट्रवादी शरद पवार ) 

5) हडपसर - चेतन तुपे ( राष्ट्रवादी अजित पवार )

6) भोसरी - महेश लांडगे ( भाजपा )

सध्या तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या मतदारसंघावर वर्चस्व दिसतंय. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात 6 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आल्या त्यामुळं आजही शिरूरची जनता डॉ. अमोल कोल्हे यांना साथ देईल ही शक्यता नाकारता येत नाही. तर खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील सध्याचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात नाराज असल्याचं बोललं जातंय. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात दिलंजमाई केली खरी पण त्यांचं काम दिलीप मोहिते पाटील कितपत करतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर शिरूर एकमेव आमदार अशोक पवार हे डॉ. अमोल कोल्हे यांची साथ देताना दिसत आहेत.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरच्या जनतेसमोर, शेतकऱ्यांचे प्रश्न,  मतदार संघात पूर्ण वेळ देणारा खासदार , तीन वर्ष खासदार असताना केलेल्या विकासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. या मतदार संघात सध्या जनतेला रोज शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात सुरू असलेली दावेप्रति दाव्याची लढाई पाहायला मिळतीय.असं असलं तरी येत्या 13 मे रोजी मतांच्या रूपातून शिरुरची जनता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हाती घड्याळ बांधतीय की डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाची तुतारी वाजवतीय पाहणं महत्वाचं असणार आहे.