अटीतटीची लढत! ईशान्य मुंबई लोकसभेत बाजी कोणाची?

मराठी, दलित, गुजराती आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेला हा मतदार संघ आहे. शिवाय यावेळी शिवसेनेची भाजपला साथ असणार नाही. तर शिवसेनेच्या जोडीला काँग्रेसची ताकद असेल. त्यामुळे ईशान्या मुंबईतली लढत ही रंगतदार होत आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील लढत ही अटीतटीची लढत होत आहे. या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यात सामना होत आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना उमेदवारी डावलत मिहीर कोटेचा यांना रिंगणात उतरवलं. शिवाय किरीट सोमय्या यांचाही पत्ता कट केला. तर शिवसेना पुर्ण ताकदीने या मतदार संघात संजय दिना पाटील यांच्या बाजूने उभा राहीला आहे. मराठी, दलित, गुजराती आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेला हा मतदार संघ आहे. शिवाय यावेळी शिवसेनेची भाजपला साथ असणार नाही. तर शिवसेनेच्या जोडीला काँग्रेसची ताकद असेल. त्यामुळे इथली लढत ही रंगतदार होत आहे. 

मतदार संघात 56.37 टक्के मतदान 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात 56.37 टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघाने आता पर्यंत कधी भाजप तर कधी  काँग्रेसला आलटून पालटून संधी दिली आहे. मात्र 2014 आणि 2019 ला सलग दोन वेळा भाजप उमेदवाराचा विजय झाला होता. त्यामुळे या मतदार संघातून भाजप हॅट्रीक करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर यावेळी शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढत असलेले संजय दिना पाटील हे दुसऱ्यांदा संसदेत जाण्यास इच्छुक आहे. निवडणुकी दरम्यान त्यांनी संपुर्ण ताकद पणाला लावली होती. शिवसेना आणि काँग्रेसची ताकद त्यांच्या बाजूने असणे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. तर भाजपचा हा गड झाल्याने त्यांना इथला विजय हा सहज होईल असा विश्वास आहे. 

Advertisement

मराठी विरुद्ध गुजराती हाच प्रचाराचा मुद्दा 

या मतदार संघात मराठी आणि गुजराती मतदारांचे प्राबल्य आहे. मुलुंड, घाटकोप पूर्व या मतदार संघावर गुजराती मतदारांचे वर्चस्व आहे. तर घाटकोपर पश्चिम, भांडूप आणि विक्रोळीमध्ये मराठी मतदारांचा जोर आहे. तर गोवंडीमध्ये मुस्लिम मतदारांचे वर्चस्व आहे. जर आकडेवारी पाहीली तर  7 लाख 33 हजार 493 मराठी मतदार आहे. तर  2 लाख 9 हजार 989 गुजराती मतदार आहे. शिवाय  2 लाख 45 हजार 575 मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे या मतदार संघात प्रचारामध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दा जास्त चर्चेत होता. काही ठिकाणी मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दा असताना दुसरीकडे हिंदू विरूद्ध मुस्लिम असाही प्रचार केला जात होता. 

Advertisement

मतदार संघाचे मुळ प्रश्न बाजूलाच 

या मतदार संघात पुर्नविकास, डोगराळ भाग, झोपडपट्ट्या, आरोग्य, डंपिंग ग्राऊड यासारखे प्रश्न आहेत. मात्र या विषयाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. पाणी, शौचालय यासारखेही मुलभूत समस्याही इथ आहेत. त्यावर तोडगा अजूनही निघालेला नाही. हे प्रश्न कोण सोडवणार अशी विचारणा मतदार करत आहे. अशा वेळी त्यांनी आता कोणाला आणि कोणत्या मुद्द्यावर मतदान केले आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण ही निवडणूक गाजली ती मराठी विरुद्ध गुजराती आणि हिंदू विरूद्ध मुस्लिम यामुळेच, असे म्हणाले लागेल. त्यामुळे मुळ मुद्दे आणि मुळ समस्या या प्रचारापासून कोसो दुर होत्या.  

Advertisement

मतदार संघात कोणाची किती ताकद 

मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पूर्वी, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. यापैकी तीन मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी दोन हे गुजराती आहेत. तर दोन मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. तर एका मतदार संघात समाजवादी पार्टीचे अबू आझमी आहेत. त्यामुळे इथे दोन्ही बाजू या तुल्यबळ दिसून येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात इथे काँट्याची टक्कर दिसत आहे. याआधी या मतदार संघात शिवसेनेची साथ भाजपला होती. पण यावेळी ती इथे किती मिळते या प्रश्न आहे. शिवसेना शिंदे गटाची म्हणावी तेवढी ताकद इथे दिसत नाही. त्यामुळे भाजपला आपल्याच बळावर ही निवडणूक लढावी लागणार आहे. काही पट्ट्यात आरपीआय आठवले गटाची मदत भाजपला होवू शकते. मराठी विरूद्ध गुजराती मुद्द्याला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला गेला. त्यामुळे त्याचा किती परिणाम होतो तो निकालातून दिसून येतो. त्याचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला याचे उत्तर चार जूनला मिळेल. 

ईशान्य मुंबईचा इतिहास काय? 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ हा कधीही कोणा एका पक्षाच्या बाजूने उभा राहीलेला नाही. इथल्या जनतेने वेगवेगळा जनाधार दिलेला आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजपचा उमेदवार इथून निवडून गेला आहे. जनता लाटेत जनता पक्षाचा उमेदवारही इथून निवडून गेला आहे. जनता पक्षाचे डॉ. सुब्रमण्यम स्वामी ही इथून निवडून गेले आहे. शिवाय दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन, जयवंतीबेन मेहता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास काम यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. शिवाय किरीट सोमय्या, संजय दिना पाटील आणि मागिल वेळेस मनोज कोटक इथून निवडून गेले आहे. त्यामुळे या मतदार संघाने नेहमीच बदल पसंत केला आहे. मात्र त्याला मागिल दोन निवडणुका अपवाद ठरल्या आहेत. यावेळी भाजपने ही जागा जिंकल्यास ती हॅट्रीक होईल.   

ईशान्य मुंबई लोकसभेतील विधानसभा मतदार संघ  

मुलुंड विधानसभा मतदारसंघ   
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ  
भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ  
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ   
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ   
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 

हेही वाचा - मतांचा टक्का वाढला, उत्तर पश्चिमचे मतदार कोणाचं गणित बिघडवणार?