उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात शिवसेना विरूद्ध शिवसेना असाच सामना रंगत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रविंद्र वायकर हे रिंगणात आहेत. दोन्ही शिवसैनिकात होणाऱ्या या सामन्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात किंचीत मतदान वाढले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे आणि कोणाचे गणित बिघडवणारे ठरणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे.
मतांचा टक्का वाढला पण...
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात यावेळी 54.84 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हेच मतदान गेल्या वेळी म्हणजे 2019 साली 54.30 टक्के होते. त्यामुळे यावेळी मताचा टक्का किंचित वाढला आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक 60.41 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळी या मतदार संघात यावेळी कमी मतदानाची नोंद झाली आहे. इथे 57.11 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा गड मानला जातो. ते इथे विद्यमान आमदार ही आहेत. त्याच मतदार संघात मतदान कमी झाले आहे. शिवाय दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पुर्व या मतदार संघातही मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र या मतदार संघातील अल्पसंख्याक भागात मोठ्या प्रमाणात मतदार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका विशिष्ठ भागात घटलेली टक्केवारी तर दुसरीकडे काही भागात वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार याची चर्चा सध्या सुरू आहे.
कोणते मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ हा समिश्र वस्तीचा मतदार संघ आहे. एकीकडे उच्चभ्रू वस्ती तर दुसरीकडे चाळी आणि झोपडपट्टीत राहाणार मतदार या मतदार संघात आहेत. मराठी मतदारांबरोबरच उत्तर भारतीय मतदारांचा इथे प्रभाव आहे. मुस्लिम मतदारांचा टक्काही निर्णायक ठरतो. या मतदार संघात कीर्तिकर विरूद्ध वायकर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या निवडणूकीला लोकांच्या मुद्द्यां पेक्षा खरा शिवसैनिक कोण? गद्दार कोण? इडीचा गैरवापर हेच मुद्दे केंद्रस्थानी राहीले. भ्रष्टाचाऱ्यांसाठी भाजपची वॉशिंगमशिन यावरही बोलले गेले. तर मोदींना साथ देण्यासाठी महायुतीने मते मागितली. प्रचाराचा रोख शिवसेनेत झालेली फुट, भाजपची त्यात असलेली भूमीका, रविंद्र वायकर शिंदे गटात गेल्यावर कसे पवित्र झाले या भोवतीच फिरत राहीला. विकासाचे मुद्दे असू दे की सर्व सामान्यांच्या समस्या असो त्यावर इतका फोकस ठेवला गेला नाही.
मतदार संघात कोणाची किती ताकद?
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पुर्व या मतदार संघाचा समावेश होतो. त्यात एक मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. भाजपचे तीन आमदार आहेत. तर दोन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे इथली लढत कागदावर तुल्यबळ वाटत आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसैनिक हे नक्की कोणा बरोबर आहेत यावरही इथले भवितव्य अवलंबून आहे. वायकर जरी शिंदें बरोबर गेले असले तरी शिवसैनिक मात्र ठाकरें बरोबर असल्याचे चित्र या मतदार संघात दिसून आले होते. शिवाय विद्यमान खासदार हे शरीराने जरी शिंदे गटात असले तरी त्यांनी मनाने मुलगा अमोल यांच्या विजयासाठी काम केल्याचेही बोलले जात आहे. तसे त्यांच्यावर थेट आरोपही झाले. शिवाय त्यांना माध्यमा बरोबर बोलण्याची बंदीही घालण्यात आली आहे. इथला मराठी मतदार हा नेहमीच शिवसेनेच्या मागे राहीला आहे. तर उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेस आणि भाजपमध्ये विभागला गेला आहे. अल्पसंख्याक समाजाने कधी काँग्रेस तर कधी समाजवादी पक्षाची पाठराखण केली आहे. यावेळी हे घटक कोणाच्या मागे उभे राहातात त्यावर यश अपयश अवलंबून आहे.
मतदार संघाचा इतिहास काय?
या मतदार संघातून जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेनेचे खासदार आलटून पाटलून लोकसभेत गेले आहेत. काँग्रेसचे सुनिल दत्त यांनी सर्वाधिक वेळा या मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. तर काँग्रेसचे गुरूदास कामत, मधुकर सरपोतदार, गजानन कीर्तिकर यांनी या मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. तसे पाहात काँग्रेसला मानणारा हा मतदार संघ होता. मात्र बदलत्या काळात या मतदार संघाने भाजप आणि शिवसेनेला साथ दिली. तरही त्यात काँग्रेसच्या मतांचा टक्का इथला कमी झालेला नाही. यावेळी बदलत्या स्थितीत हा मतदार संघ आता कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेतील विधानसभा मतदार संघ
जोगेश्वरी पूर्वी
दिंडोशी
वर्सोवा
गोरेगाव वर्सोवा
अंधेरी पश्चिम
अंधेरी पुर्व
हेही वाचा - उत्तर मध्य मुंबईत तगडी लढत, गायकवाड की निकम? कौल कुणाला?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world