महायुतीत दक्षिण मुंबईची जागा भाजप की शिवसेना? कुणाला सुटणार याचा पेच अद्यापही सुटलेला नाही. मात्र आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेनेकडून भायखळाच्या विद्यमान आमदार यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपकडून या मतदारसंघातून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
(नक्की वाचा - शक्तिप्रदर्शनाने गाठली 'उंची'; छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांच्या उमेदवारी अर्जाची गावभर चर्चा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला पसंती दिली. यामिनी यशवंत जाधव सध्या मुंबईतील भायखळा विधानसभेतून आमदार आहेत.
यामिनी यशवंत जाधव यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. मुंबई महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या त्या अध्यक्षा देखील होत्या. विधिमंडळ शक्ती विधेयक समितीच्या देखील त्या सदस्या होत्या. या समितीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
(नक्की वाचा- सांगलीनंतर 'या' मतदारसंघातही मविआमध्ये बंडखोरी; आता ठाकरे काय करणार?)
ठाण्याची जागा देखील शिवसेनेच्या वाट्याला?
ठाण्याची जागा देखील शिवसेनेच्या वाट्याला येण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाण्याच्या जागेसाठी देखील भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावं पुढे येत आहे. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे. प्रताप सरनाईक यांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रताप सरनाईक यांनी तशी तयारी देखील सुरु केल्याचं कळतंय.