उमेदवारी अर्ज भरायला निघताना सर्वसाधारणपणे बडे राजकीय नेते, कार्यकर्त्यांची गर्दी यासाठी उमेदवाराचा प्रयत्न असतो. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्तिप्रदर्शन करीत विजय नक्कीच असा सांगण्याचा प्रयत्न असतो. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उमेदवाराने अनोख्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन केलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार महाशय थेट उंचावरुन जिल्हाकार्यालयात दाखल झाले आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी नवनवीन अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उमेदवाराची चर्चा आहे. या उमेदवाराचे नाव साहेब खान पठाण असं असून लोकसभा निवडणुकीत 'मीच जिंकणार' असा दावा या महाशयांनी केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना यांनी थेट उंटावरून स्वारी करत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि अनोखं शक्तिप्रदर्शन केलं.
नक्की वाचा- राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले
यावेळी शहरातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. तर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. लोकसभेच्या रिंगणात अनेक दिग्गज उतरत आहे. कोणी प्रचारासाठी हेलीकॉप्टरने येत आहे. तर कोणी लाखो रूपयांची गाडी प्रचारासाठी आणत आहे. परंतु साहेब खान पठाण यांनी वेगळीच शक्कल लढवली आणि उंटावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केला. 26 एप्रिलपर्यंत कोण कोण काय स्टंट करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world