लोकसभेनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांनीही आपण सक्षम उमेदवार कसे आहोत, हे दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षातील विद्यमान आमदारा विरोधातही भूमीका घ्यायला हे इच्छुक मागे पुढे पाहात नाहीत. असेच काहीशे एकनाथ शिंदें यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये घडलं आहे. शिवसेना शिंदेगटाच्या विद्यमान आमदारा विरोधातच इच्छुकाने शड्डू ठोकत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'कल्याणचा विकास झाला नाही'
कल्याण विधानसभेचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. या मतदार संघातून आता शिंदे गटाचेच माजी नगरसेवक श्रेयस समेळ हे इच्छुक आहेत. कल्याण हे मुंबईच्या जवळचे शहर आहे. पण या शहराचा हवा तसा विकास झालेला नाही असे वक्तव्य करत त्यांनी पक्षाच्या आमदारालाच घरचा आहेर दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - भुजबळ-जरांगे एकमेकांना भिडले,जरांगेंचे मोठे वक्तव्य,मराठा- ओबीसी- धनगर वाद पेटणार?
कोण आहेत श्रेयस समेळ?
कल्याण पश्चिमेत जसा विकास व्हायला पाहिजे होता.तसा विकास झालेला नाही असे समेळ म्हणाले आहे. मी उच्च शिक्षित आहे. दहा वर्षे नगरसेवक होतो.पक्षाचे काम आजही करत आहे. या वेळी पक्षश्रेष्ठी मला आमदारकी देणार असा विश्वास आहे असेही ते म्हणाले. समेळ हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. शहराचा विकास झाला नाही असे बोलून त्यांनी आपल्याच आमदाराची कोंडी केली आहे.
कल्याणमध्ये अनेक जण इच्छुक
नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. कल्याण लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदे निवडून आले. तर भिवंडी लोकसभेत महायुतीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील हे पराभूत झाले. कल्याण पश्चिम विधान सभा मतदार संघातून महायुतीला 1 लाख 5 हजार मते मिळाली. तर महाविकास आघाडीला 75 हजार मते पडली आहे. मताधिक्य पाहता महायुतीचे पारडे जड आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर हे तर इच्छुक आहेतच पण त्यांच्या बरोबर अन्य ही उमेदवारी मिळेल या आशेवर आहेत. त्यात कल्याण शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी नगरसेवक श्रेयश समेळ यांचा समावेश आहे.
समेळ यांचा दावा का?
समेळ यांनी आपण दावा का केला याचेही कारण सांगतात. आमचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आणि समाज कारणात आहे.मी उच्च शिक्षित आहे. गेल्या दहा वर्षात मी नगरसेवक होतो. मागच्या आमदारकीच्या निवडणूकीस मी इच्छूक होतो. मात्र पक्षाने उमेदवारी भोईर यांना दिली. त्यांना विरोध न करता पक्षाचे काम केले आहे. आत्ता मी इच्छूक आहे असे समेळ यांनी सांगितले. मुंबईला लागून असलेल्या कल्याण शहराचा जसा विकास व्हायला हवा होता.तसा विकास झालेला नाही. गेल्या २५ वर्षात काय झाले या वर मी बोलणार नाही. परंतू या वेळी निवडणूक लढण्यास इच्छूक आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्पना दिल्याचेही त्यांनी सांगितले.