Shrikant Shinde net worth : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी (2 मे) रोजी उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून रंजक माहिती पुढं आलीय. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना कर्ज दिलंय. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या आईलाही कर्ज दिलंय, अशी माहिती या प्रतिज्ञापत्रातून उघड झाली आहे. शिंदे यांनी अर्ज भरल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संपत्तीचं विवरण देण्यात आलंय. त्यामधून कर्जाबाबतची ही रंजक माहिती समोर आलीय.
किती आहे श्रीकांत शिंदेंची संपत्ती ?
त्यांच्या पत्नीच्या हिऱ्याची अंगठी 7 लाख 56 हजार रुपये किंमतीची आहे. श्रींकांत शिंदेंकडे 11 लाख 34 हजारांचं सोनं आहे. तर त्यांच्यावर 1 कोटी 77 लाखांचं कर्ज आहे.
( नक्की वाचा : .... तर 20 वर्ष सरकार बदललं नसतं, ' Exclusive मुलाखतीमध्ये शरद पवारांचा दावा )
श्रीकांत शिंदेंच्या पत्नीकडं 1 लाख 41 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्यावर 4 कोटी 85 लाख, 83 हजार 893 रुपयांचं कर्ज आहे. श्रीकांत शिंदेंकडं एकही वाहन नाही. त्यांच्या नावार सातारा जिल्ह्यातील दरे गावात 2 कोटी 71 लाख रुपये बाजारमुल्य असलेली शेतजमीन आहे. तर पत्नींच्या नावावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 कोटी 6 लाख रुपये बाजारमुल्य असलेली शेत जमीन आहे. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नींची एकत्र 14 कोटी 92 लाख 8 हजार 812 रुपये संपत्ती आहे. त्याचबरोबर त्यांच्या नावावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही, अशी माहिती या प्रतित्रापत्रात देण्यात आली आहे.
श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवतायत. त्यांनी यापूर्वी 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत विजय मिळवलाय. आता विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्या घराण्यातील चार पिढ्या उपस्थित होत्या. श्रीकांत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे आजोबा आणि मुलाच्यासोबत हा अर्ज भरला.