- शिवसेना शिंदे गटातील माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यावर गंभीर आरोप
- अनिता माळगे या शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती
- अनिता माळगे यांनी सिद्धराम म्हेत्रे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
सौरभ वाघमारे
नगरपालिका, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते कामाला लागले आहे. इच्छुकांची तर तारांबळ उडाली आहे. तिकीट मिळणार की नाही? मिळालं नाही तर पर्याय का याची चाचपणी ही ते करत आहे. त्यातून अनेक ठिकाणी तणावाच्या घटना ही समोर येत आहेत. त्या पैकीच एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली आहे. इथं शिवसेना शिंदे गटाच्या माजी मंत्र्याने आपल्याच महिला कार्यकर्तीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसा आरोप त्या महिलेने केला आहे. त्यामुळे निवडणुकी आधीच इथलं पक्षांतर्गत वातावरण तापलं आहे.
सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटात वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटाच्या महिला नेत्याचे माजी गृहराज्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या अनिता माळगे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्या जिल्हा परिषदसाठी बोरामणी गटातून निवडणूक लढण्यात इच्छूक आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या तिकिटासाठी ग्रीन सिग्नल दिला होता असा दावा अनिता माळगे यांचा आहे. मात्र सिद्धराम म्हेत्रे हे आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी दबाव आणत आहेत असा आरोप ही त्यांनी केला आहे. शिवाय तुला उडवतो- तुला गाडी खाली चिरडतो अशा जिवे मारण्याच्या धमक्या ही त्यांनी दिल्या आहेत. असा आरोप करून त्यांनी एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपाने निवडणुकी आधीच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
अनिता माळगे यांनी तर आपण याबाबत पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. शिवाय लवकरच पत्रकार परिषद घेऊन ते सादर करू असं ही त्या म्हणाल्या. दरम्यान माजी गृहराज्य मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणतीही धमकी दिलेली नाही. बोरामणी गटातून दुसरा सक्षम नेता असल्याने तिकीट देता येणार नाही असं त्यांना सांगितलं आहे. असं म्हेत्रे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या रागातूनच त्या आरोप करत असतील असं ही ते म्हणाले. तिकीट मिळणार नसल्याने अनिता माळगे खोटे आरोप करतं असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.