- सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष आहे.
- राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे
- राजन पाटील यांनी उमेश पाटील यांचे आव्हान टाळत त्यांच्यावर टीका केली आहे.
सौरभ वाघमारे
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये दोन पाटलांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील तर दुसरे आहेत भाजपचे माजी आमदार राजन पाटील. या दोघांमधला राजकीय संघर्ष सर्वांना माहित आहे. त्यात आता उमेश पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधली आहे. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी राज पाटील यांना आपल्या विरुद्ध लढण्याचे आव्हान दिले होते. त्याला राजन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने दोन्ही पाटलांमधील वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
मोहोळचे माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलावर जोरदार टीका केली आहे. कुस्ती पैलवानासोबत होते, असं म्हणत त्यांनी टाळी वाजवली. पुढे ते म्हणाले अशां सोबत कुस्ती कशी काय होऊ शकते. राजन पाटील यांनी असे वक्तव्य करत उमेश पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले होते. मात्र चॅलेंज आपल्या बरोबरच्या माणसाचे स्वीकारायचे असते, कोणाचेही चॅलेंज स्वीकारलं तर लोकं हसतील असा टोला राजन पाटील यांनी लगावला आहे.
नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: e-KYC करताना गडबड झालीय? आता लाडकी बहिण योजने बाबत मोठा निर्णय
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यात राजन पाटलांच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तर दुसरीकडे उमेश पाटलांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीच्या मैदानात आहेत. विरोधकांकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे सर्वपक्ष एकत्रित आले आहेत. विरोधकांची अवस्था केविलवाणी झाली आहे असं राजन पाटील म्हणाले. सगळीकडे आपली दुकानदारी चालली पाहिजे, सत्तेतून संपत्ती मिळावी म्हणून विरोधकांनी वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरलेत असा आरोप ही त्यांनी केला.
राजन पाटील मुक्त तालुका करण्यासाठी त्यांच्या बापजाद्याची संपत्ती नाही, तालूका कोणाकडे द्यायचं हे जनता ठरवेल असं ही माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोहोळ तालुक्यातील कुरुल गटातून उमेश पाटील राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोहोळ तालुक्यात भाजप विरोधात राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 3 जागावर राष्ट्रवादी, दोन जागावर शिवसेना तर एका जागेवर शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत.