Video : राहुल गांधींच्या सभेचं स्टेज खचलं, मोठी दुर्घटना टळली

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव स्टेजवर जाताच अचानक या सभेसाठी बनवण्यात आलेलं स्टेज खचलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
राहुल गांधी स्टेजवर जाताच ते खचलं
पाटणा:

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सध्या सुरु आहे. सर्वच प्रमुख नेते या प्रचारात व्यस्त आहेत. बिहारची राजधानी पाटणामधील पालीगंजमध्ये प्रचार सभा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव या सभेला उपस्थित होते. राहुल आणि तेजस्वी स्टेजवर जाताच अचानक या सभेसाठी बनवण्यात आलेलं स्टेज खचलं. राहुल, तेजस्वीसह इंडिया आघाडीचे अनेक नेते त्यावेळी स्टेजवर उभे होते. सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. स्टेज खचण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिसा भारती यांनी सांभाळलं

स्टेज खचल्याचं जाणवताच मीसा भारती यांनी राहुल गांधी यांचा हात पकडला आणि त्यांना सांभाळलं. थोड्याच वेळा सुरक्षा रक्षकही राहुल गांधी यांच्या जवळ आला. त्याला मी ठीक आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. तेजस्वी यादव यांना दुसऱ्या नेत्यांनी आधार दिला. यापूर्वी राहुल गांधी यांनी पटनामधील बख्तियारपूरमध्ये सभा घेतली. त्या सभेत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. 

( नक्की वाचा : निवृत्तीच्या 6 दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांना मुदतवाढ, वाचा काय आहे प्रकरण? )

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. 1 जून रोजी हे मतदान होणार असून त्यामध्ये सात राज्य आणि केंद्र शासित प्रदेश चंदिगडचा समावेश आहे. शेवटच्या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत 6 टप्प्यांचं मतदान पूर्ण झालंय. यापूर्वी सहाव्या टप्प्याचं मतदान 25 मे रोजी झालं होतं. 

Advertisement