राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
बुधवारी 12 जून रोजी अजित पवारांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या.
नक्की वाचा - NCP Foundation Day : शरद पवार... राजकारणाचे चाणक्य, ज्यांची प्रत्येक खेळी हैराण करणारी!
काय म्हणाले छगन भुजबळ?
बुधवारी झालेल्या बैठकीत एनसीपीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि आपली भूमिका मांडण्यास सांगितली होती. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रफुल पटेलांच्या प्रस्तावाचं समर्थन केलं. मात्र एनसीपीचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबन यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. मी आणि परांजपे या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छूक होते, मात्र त्यांचा नावाची शिफारस करण्यात आली नव्हती, यामुळे भुजबळ नाराज होते. मी राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होतो. पण पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. पार्टीत वरिष्ठ निर्णय घेतात. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावे लागेल, असं म्हणज भुजबळांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.