स्वानंद पाटील, प्रतिनिधी
यात्रेची परंपरा भारताला नवी नाही धार्मिक सामाजिक, राजकीय यात्रा आपण अनेक वेळेला पाहिली आहे. राज्यात विधानभा निवडणुकांचा प्रचार सुरु असताना हिंदुत्ववादी धर्मगुरुंच्या यात्रेची चर्चा बीड जिल्ह्यात सुरु आहे. गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलंच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचाही बीड जिल्हा केंद्र होता. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांनाही जातीय राजकारणाचा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात हिंदुत्ववादी धर्मगुरुंची यात्रा दाखल होण्यास महत्त्व आहे, असं मानलं जातंय.
अयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात शिवचैतन्य जागरण यात्रेचं राज्यात सध्या आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईमध्ये शुक्रवार (8 नोव्हेंबर) ही यात्रा दाखल झाली. हिंदूंनी 100 टक्के मतदान करणे आवश्यक आहे. हिंदू समाजात मतदानाबद्दल मोठी उदासीनता दिसून येते. हिंदूंचे मतदान केवळ पन्नास टक्यांच्या आसपासच होते ही खरोखर राष्ट्रीय आपत्ती आहे, असं गिरी महाराज यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदान केवळ अधिकार नाही आपले पवित्र कर्तव्य आहे. आज देशापुढे उभ्या असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य एका शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा संपूर्ण समाजात जागृत व्हावी, राष्ट्र समर्थ बनावे त्यासाठी ही शिव चैतन्य जागरण यात्रा काढण्यात आली आहे असे गोविंददेव गिरिजी महाराज यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असला तरी माझी यात्रा गुढीपाडव्यापासूनच सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : महाराष्ट्राची भाषा घाण करणारा संपादक इथं राहतो, xx डू समजू नका, भांडुपमध्ये राज ठाकरेंचा हल्लाबोल )
संगमनेरपासून सुरू झालेली यात्रा आळंदी, पंढरपूर, औसा ,बदनापूर, संभाजीनगर गंगापूर पुणे साताराकराड मार्गे पुढं प्रवास करणार आहे. दरम्यान यात्रेच्या मार्गाचा सखोल अभ्यास केल्यास ही यात्रा नेमकी कोणाच्या फायद्यासाठी आहे याची चर्चा रंगली आहे.