हितेंद्र ठाकूरांकडे उमेदवारी मागण्यासाठी किती जण आले? ठाकूरांनी काय केले?

जाहिरात
Read Time: 2 mins
पालघर:

पालघर लोकसभेची निवडणूक बहुजन विकास आघाडी लढवणार असल्याचे पक्षाचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांना भेटत आहे. नुकतात पक्षाने एक मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली. शिवाय इच्छुक उमेदवारांची चाचपणीही केली. पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यांचे तिन आमदारही या लोकसभेत आहेत. शिवाय तिरंगी लढत होणार असल्याने त्याचा फायदा होईल असा पक्षाला विश्वास आहे. त्यामुळेच बहुजन विकास आघाडची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची रांग हितेंद्र ठाकूरांकडे लागली आहे.

हेही वाचा  - पहिल्या निवडणुकीत किती खर्च केला? शरद पवारांनी आकडाच सांगितला

उमेदवारीची किती जणांनी केली मागणी 

पक्षाध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी इच्छुकांसोबत चर्चा केली आहे. पालघरमधून उमेदवारी मिळावी यासाठी जवळपास दहा जणांनी मागणी केली आहे. त्यात माजी खासदार बळीराम जाधव, आमदार राजेश पाटील, माजी मंत्री मनिषा निमकर, वाड्याचे माजी  सभापती संतोष बुकले, जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव, पालघरचे माजी पंचायचत समिती सदस्य पाडूरंग गोवारी यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या सर्वांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. 

उमेदवारीवर तोडगा कसा? 


एका पेक्षा जास्त जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्यावर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न हितेंद्र ठाकूर यांच्या समोर आहे. पुढच्या दोन दिवसात उमेदवारी कोणाला देणार हे जाहीर करणार असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या स्थितीत आमदार राजेश पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर माजी खासदार बळीराम जाधव यांनी ही उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला आहे. सर्व इच्छुकांनी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत सर्वाधिकार हे ठाकूर यांना दिला आहेत. 

पालघरमध्ये तिरंगी लढत होणार


पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भारती कामडी यांनी ठाकरेंनी मैदानात उतरवले आहे. तर महायुतीकडून अजून कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय हा मतदार संघ कोणाला जाणार हे ही निश्चित झालेले नाही. शिंदे गट आणि भाजप त्यासाठी आग्रही आहेत. दरम्यान विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हे प्रचारालाही लागले आहेत. यांच्याबरोबर हितेंद्र ठाकूरही आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहे. त्यामुळे पालघरची लढत तिरंगी होणार आहे. 

Advertisement