Thackeray Brothers Interview: येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून, राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.
शिवसेना उबाठा आणि मनसेच्या या ऐतिहासिक युतीची पहिली मोठी परीक्षा मुंबईत होणार आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही नेत्यांची एक विशेष मुलाखत पार पडली, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी व्हेनेझुएलाचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर धक्कादायक आरोप केला आहे.
काय म्हणाले ठाकरे?
या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केला. ते म्हणाले की, सध्या ज्या पद्धतीने लोकशाहीची थट्टा सुरू आहे, ते पाहता आगामी काळात जिल्हाध्यक्ष आणि महापौरांनाही व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांप्रमाणे उचलून नेले जाईल. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना जसे सत्तेवरून हटवण्यासाठी बाहेरून येऊन उचलून नेले गेले, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपले मंत्री ज्या पद्धतीने सुरत आणि गुवाहाटीला नेले गेले, तसेच प्रकार ट्रम्प यांनी केल्याचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची ही वृत्ती लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका त्यांनी केली
संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत
उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली. यामध्ये ठाकरे बंधूंनी केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर रोखठोक मते मांडली.
राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत, सध्याचे मुख्यमंत्री हे केवळ भाजपाचे असल्याचा टोला लगावला. सत्ता मिळवण्यासाठी मित्रपक्षांवर धाडी टाकल्या जातात आणि पैसे दिसले की पुढची कारवाई थांबवली जाते, यावर त्यांनी संताप व्यक्त केला.
(नक्की वाचा : BMC Election 2026: संतोष धुरीनंतर आणखी एका बड्या नेत्यानं राज ठाकरेंची साथ सोडली, पत्रात केले खळबळजनक आरोप )
निवडणूक आयोगावर टीका
राज्यात ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यावर राज ठाकरे यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, तिथे आमचा दोघांचा एकही उमेदवार नाही किंवा एकही अपक्ष नाही, हा योगायोग असूच शकत नाही.
हे सर्व मॅनेज केलेले असून त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच नोटा वाटल्यामुळे मतदानाचा अधिकारच हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
( नक्की वाचा : Akola News : अकोटचा AIMIM बरोबरचा'अनाकलनीय' प्रयोग भाजपाला झोंबला; 'त्या' आमदारावर होणार मोठी कारवाई! )
तरुणांचा अस्वस्थपणा आणि ईश्वरी शक्तीवर सवाल
सध्याच्या राजकारणामुळे 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी प्रचंड अस्वस्थ असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. या तरुणांच्या मनातील संताप जर बाहेर आला, तर सध्याच्या राज्यकर्त्यांना ते महागात पडेल असा इशारा देण्यात आला. राज ठाकरे यांनी सध्याचे राजकारण पाहून देवी-देवतांच्या अस्तित्वावरही प्रश्न उपस्थित केला. अशा भ्रष्ट गोष्टी सुरू असताना देव गप्प कसे काय बसले आहेत, असे ते उद्विग्नतेने म्हणाले. लोकांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.