BJP-AIMIM Alliance in Akot Sparks Controversy : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम यांच्यात झालेल्या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने त्याचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावर मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत.
अकोट नगरपरिषदेतील राजकीय भूकंप
अकोट नगरपरिषदेच्या 2025 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अशा स्थितीत सत्तेची गणिते जुळवण्यासाठी भाजपाने चक्क असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षासोबत हातमिळवणी केली. देशाच्या राजकारणात दोन भिन्न टोकाचे विचार असलेले हे पक्ष एकत्र आल्याने राजकीय विश्लेषकांसह सामान्य जनतेलाही मोठा धक्का बसला.
या युतीमुळे अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाली असली तरी, पक्षाच्या ध्येय धोरणांविरुद्ध ही कृती असल्याचे सांगत भाजपामधूनच तीव्र संताप व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Ambernath News: अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसकडून निलंबन होताच 12 नगरसेवकांचा भाजपा प्रवेशाचा प्लॅन )
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची नाराजी
या युतीचे वृत्त समोर येताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला छेद देणारी ही युती पक्षासाठी घातक असल्याचे मत पक्षश्रेष्ठींकडून व्यक्त करण्यात आले.
त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या युतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत त्यांनी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
( नक्की वाचा : BMC Election 2026: संतोष धुरीनंतर आणखी एका बड्या नेत्यानं राज ठाकरेंची साथ सोडली, पत्रात केले खळबळजनक आरोप )
आमदार प्रकाश भारसाखळे यांना नोटीस
या सर्व घडामोडींचे मुख्य सूत्रधार म्हणून अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना अधिकृतपणे कारणे दाखवा नोटीस धाडली आहे.
या नोटिशीमध्ये असे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत एमआयएमसोबत युती करून आपण पक्षाच्या ध्येय धोरणांना सुरुंग लावला आहे. ही कृती करताना कोणालाही विश्वासात घेतले गेले नाही, ज्यामुळे पक्षाची जनमानसातील प्रतिमा खराब झाली आहे. आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत तातडीने खुलासा करण्याचे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
आमदार भारसाखळे यांच्या खुलास्यानंतर भाजपा प्रदेश नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे अकोटमधील स्थानिक राजकारणातही मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. पक्षाची शिस्त मोडणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे संकेत रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world