'उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार' निवडणुकीच्या तोंडावर भाजप केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी होवून ते लवकरच जेलमध्ये जाणार आहेत. असं वक्तव्य करत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्याला एक वेगळेच महत्वही प्राप्त झाले आहे. कोरोना काळात औषध घोटाळा झाल्याचा आरोपही या केंद्रीय मंत्र्याने केला आहे. औषधाचे टेंडर देताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पंधरा टक्के कमिशन घेतल्याचाही त्यांचा दावा आहे. या प्रकरणात चौकशी होवून ठाकरे जेलमध्ये बसतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.     

खळबळ उडवून देणारा मंत्री कोण? 
उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात औषधांचे टेंडर देण्यात घोटाळा केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. हे टेंडर देताना पंधरा टक्के कमिशन घेतले गेले. त्यानंतर टेंडर वाटली गेली असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी होवून ठाकरे हे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत त्यांनी खळबळजनक उडवून दिली आहे. या टक्केवारीमध्ये आदित्य ठाकरेंचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. सिंधुदुर्गमध्ये एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.  

हेही वाचा - राणेंना उमेदवारी, शिंदेंच्या पदरी निराशा, रत्नागिरी -सिंधुदुर्गही हातून गेला

'अब की बार तडीपार' 
दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अब की बार चारशे पारच्या नाऱ्याची खिल्ली उडवली होती. शिवाय अब की पार पडीपार अशी घोषणा दिली होती. त्याचाच समाचार राणे यांनी घेतला. मोदींना आणि भाजपला तडीपार करायला निघालेले ठाकरेच तडीपार होतील असे ते म्हणाले. शिवाय ठाकरेंचे खासदार  पाच आणि ते तडीपार करायला निघाले असा टोला ही राणे यांनी लगावला. 

हेही वाचा - अजित पवारांनी केलं थेट शरद पवारांना लक्ष्य, कामाचा हिशेबच मांडला, वाद पेटणार?

निवडणूक जिंकण्याचा दावा 
दरम्यान नारायण राणे यांनी लोकसभेची निवडणूक आपणच जिंकू असा दावा केला आहे. राणे यांनी भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी दिली आहे. कोकणाला आतापर्यंत आपण भरभरून दिलं. 1990 पर्यंत कोकणात काही नव्हते. जेव्हा आपण इकडे आलो त्यानंतर रस्ते, पाणी, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज कोकणात आली. उद्धव ठाकरेंनी मु्ख्यमंत्री असताना काय केले? असा प्रश्नही राणे यांनी करत त्यांनी बालवाडी तरी आणली का अशी विचारणा यावेळी केली. चिपी विमानतळही आपण आणले पण त्याला विद्यमान खासदारांनी विरोध केल्याचे राणे यांनी सांगितले.   

Advertisement