Vasai News : भर सभेत प्रदेशाध्यक्षांना अडवलं! वसईत भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक; पाहा काय घडलं

Vasai Virar Municipal Election 2026 :  वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वसई:

Vasai Virar Municipal Election 2026 :  वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. वसईतील माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात  मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभा संपल्यानंतर बाहेर पडताना भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्षांना अडवून पक्षात चाललेल्या तिकीट वाटपावरून खडे बोल सुनावले.

खळबळजनक आरोप

निशिकांत म्हात्रे यांनी यावेळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलले जात असून बाहेरून आलेल्यांना आणि चाळ माफियांना तिकिटे विकली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. स्थानिक नेतृत्वावर देखील त्यांनी यावेळी निशाणा साधला. या प्रकारामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. 

अखेर पोलिसांनी म्हात्रे यांना बाजूला करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील जुन्या फळीत मोठी नाराजी पसरली असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.

(नक्की वाचा : BMC Election 2026 : राजकीय चमत्कार! किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात ठाकरेंनी उमेदवारच दिला नाही; काय आहे कारण? )

पूनम महाजन यांनी मागितली माफी

या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महानगरपालिका निवडणूक मुख्य प्रभारी आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील इच्छा आणि अपेक्षा मांडणे यात काहीही चुकीचे नाही, असे त्या म्हणाल्या. कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे आणि मी स्वतः देखील एक कार्यकर्ता आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

कोणा कार्यकर्त्याला डावलले गेल्याची भावना असेल, तर मी त्यांची हात जोडून माफी मागते, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. वसई विरारची जनता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असून वैयक्तिक इच्छा त्यापेक्षा मोठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

चव्हाणांनी काय सांगितलं?

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली. संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका असून सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जागा मर्यादित असल्यामुळे काही चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे कठीण होते. ज्यांनी बंडखोरी करत अर्ज भरले आहेत, त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांना पक्षात इतर ठिकाणी नक्कीच संधी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Advertisement

बंडखोरी रोखण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान

वसई भाजपमधील नाराजी आता केवळ शब्दांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिकीट नाकारल्यामुळे शेखर धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करत शिट्टी या चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक किरण भोईर, कांचन झा, गणेश भुरकुंड, प्रसाद पाटील, पराग चोरघे, महेश कदम आणि प्रदीप पांडेय यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी केल्यामुळे या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे सेनेसोबतच आपल्याच पक्षातील बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे राहिले आहे.