जाहिरात

BMC Election 2026 : राजकीय चमत्कार! किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात ठाकरेंनी उमेदवारच दिला नाही; काय आहे कारण?

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते किरीट सोमय्या यांना त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंनी दिलासा दिला आहे.

BMC Election 2026 : राजकीय चमत्कार! किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात ठाकरेंनी उमेदवारच दिला नाही; काय आहे कारण?
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि किरीट सोमय्याला दिलासा मिळाला आहे.
मुंबई:

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यासाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडणूक लढवत असलेल्या नील सोमय्या यांच्यासमोरचे प्रमुख राजकीय अडथळे आता दूर झाले असून त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. 

राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांचे आर्थिक घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्या गेल्या काही काळापासून भाजपमध्ये फारसे सक्रिय नसले तरी, त्यांच्या मुलाला पक्षाने पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे सोमय्यांचे कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार आता या रिंगणात उरलेला नाही.

काय आहे कारण?

या निवडणुकीत नील सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मोठी फळी उभी केली जाणार असे वाटत होते. त्यानुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हंसराज दानानी यांना वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी जाहीर केली होती. दानानी यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता, मात्र छाननी दरम्यान त्यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळण्यात आला. 

उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेले प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष या निवडणुकीतून बाहेर पडला आहे.

( नक्की वाचा : Thane News: शिंदेंच्या ठाण्यात नरेश म्हस्केंना धक्का! तिकीट नाकारताच 'हट्टी मुलाच्या 'पोस्टनं वातावरण तापलं )
 

ठाकरे आणि मनसेकडून वॉक ओव्हर

किरीट सोमय्या यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळेच सोमय्या यांना तिकीट नाकारण्यात आले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आजही रंगते. अशा स्थितीत नील सोमय्या यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष होते. 

मात्र, जागावाटपाच्या गणितात ही जागा शरद पवार यांच्या पक्षासाठी सोडण्यात आल्याने ठाकरेंनी येथे उमेदवार दिला नव्हता. तसेच राज ठाकरे यांच्या मनसेनेही या वॉर्डात आपला उमेदवार उतरवलेला नाही, त्यामुळे सोमय्या यांना एक प्रकारे वॉक ओव्हर मिळाल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )

मैदानात आता कोण?

 प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात नसले, तरी नील सोमय्या यांची निवडणूक बिनविरोध झालेली नाही. काँग्रेसने ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली असून, मुंबईत काँग्रेस आणि वंचितची युती असल्याने येथे वंचितचा उमेदवार रिंगणात आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह इतर 9 अपक्ष उमेदवार नील सोमय्या यांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे  शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि ठाकरे गट स्पर्धेत नसला, तरी नील सोमय्या यांना विजयाचा गुलाल उधळण्यासाठी या उमेदवारांचा सामना करावाच लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com