काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सांगली विधानसभेचा पेच मात्र कायम आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या जयश्री मदन पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत माजी मंत्री विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या नेत्यांची बंद दाराआड चर्चाही झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीत काँग्रेसने उमेदवारी डावलल्याने पुन्हा सांगली पॅटर्नची अंमलबजावणी केली जात आहे. म्हणूनच जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये वसंतदादा पाटील घराण्याला डावलल्याची भावना आहे. अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते.
ट्रेंडिंग बातमी - दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले
त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेनीथला यांनी जयश्री यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ती त्यांनी धुडकावून लावली होती. यानंतर काँग्रेसचे स्टार प्रचारक विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांच्यावर जयश्री पाटील यांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर या चौघांमध्ये तब्बल चार तास बंद दाराआड चर्चा झाली.
ट्रेंडिंग बातमी - मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?
या चर्चेनंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांची बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीनंतर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या घरी देखील बैठक घेण्यात आली. या बैठकांनंतर जयश्री पाटील या काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील जयश्री यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का याकडे आता सांगली काँग्रेसचे लक्ष लागले आहे. जयश्री पाटील या मैदानात राहील्यास त्याचा थेट फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आहे.