Devendra Fadnavis Sanjay Raut : NDTV मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी हस्तांदोलन केलं, तो क्षण
मुंबई:
'व्होट जिहाद' आणि फेक नरेटिव्ह हे प्रकार आगामी विधानसभा निवडणुकीत चालणार नाहीत. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती पुन्हा सत्तेवर येईल. भाजपा आगामी विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस यांनी NDTV मराठीला दिलेल्या Exclusive मुलाखतीमधील महत्त्वाचे मुद्दे पाहूया
- भाजपा सर्वात मोठा पक्ष : मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे आकडा सांगत नाही. मी इतकंच म्हणेल या निवडणुकीत महायुतीला अनुकूल वातावरण आहे. भाजपा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांसह सरकार बनवू, इतकं बहुमत आम्हाला असेल.
- फेक नरेटिव्ह : लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीनं फेक नरेटिव्ह तयार केला. आम्ही त्याला स्ट्रेट ड्राईव्हनं उत्तर दिलं आहे. आता ते खोटं बोलत आहेत, हे लोकांना समजलं आहे. मोदीजी (PM Narendra Modi) सत्तेत आले तर राज्यघटना बदलतील, आरक्षण संपवतील असा त्यांनी प्रचार केला. त्यामुळे लोकांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीला मतदान केलं. त्यानंतर राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. त्यांचं खोटं उघडं पडलं आहे.
- व्होट जिहाद : व्होट जिहाद हा लोकसभा निवडणुकीतील फॅक्टर होता. एका विशिष्ट समुहाचे लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी भाजपाच्या विरोधात मतदान केलं. हे यंदा चालणार नाही.
- उद्धव ठाकरेंच्या यादीत आमचे 17 जण : उद्धव ठाकरे यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 17 जण आमचे आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत प्रत्येक जण कलाकार आहे, चांगले लोकं राजकारणापासून दूर झाले आहेत. हे दुर्दैवी आहे.
- वाढवण बंदर : देशामधील सर्वात मोठं बंदर JNPT चं पोर्ट आहे. आता वाढवण बंदर JNPT च्या तीनपट आहे. जगातील सर्वात मोठं जहाज तिथं येऊ शकतं. जगातील दहा बंदरामध्ये एकही भारतीय बंदर नव्हतं. पहिल्या दिवसांपासून वाढवणचं बंदर जगातील टॉप 10 बंदरामध्ये असेल. दहा लाख रोजगाराची निर्मिती या एका बंदरामुळे होईल. भारत सागरी क्षेत्रातील एक सत्ता या बंदरामुळे होणार आहे.
- कोस्टल रोड : कोस्टल रोड संदर्भात मी पाच बैठका केल्या सर्व अडचणी दूर केल्या. मी तो रोड मंजूर करुन आणला, हायकोर्टात लढलो. सुप्रीम कोर्टात लढलो, सुप्रीम कोर्टात जिंकलो. तेव्हा तो कोस्टल रोड सुरु झाला. आजही सांगतो कोस्टल रोड MMRDA, सिडको, MSRTC नं बांधावा असं आमचं मत होतं, उद्धवजी म्हणाले आमच्या महापालिकेला बांधायला द्या. त्यानंतर आम्ही तो महापालिकेला बांधायला दिला. त्यांचं योगदान असेल तर त्यांनी तो माझ्याकडून महापालिकेकडं घेतला, इतकंच योगदान आहे.
- विधानसभा निवडणुकीनंतर काय करणार? : मी निवडणुकीनंतर काय करणार हे पक्ष ठरवेल. पक्षानं सांगितलं इथं थांबा तर मी इथं थांबेन. पक्षानं सांगितलं दिल्लीला जा तर मी तिकडं जाईन. जर पक्षानं सांगितलं की तुम्ही घरी राहा तर मी घरी परत जाईन.
- नितीन गडकरी मार्गदर्शक : नितीन गडकरी माझे मार्गदर्शक आहेत. मी अर्ज दाखल करण्यापूपर्वी पहिल्यांदा आई आणि नंतर गडकरींच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतो.
- मराठवाड्यात कामगिरीची पुनरावृत्ती करू : मराठवाड्यात आमची कामगिरी रिपीट करु, आम्हाला मराठा समाजानं व्होट दिलं नाही, हे सांगितलं जातं. त्यांना माझा साधा प्रश्न आहे ज्याांना मराठे मत देणार नाहीत त्यांना 43 टक्के मतं मिळू शकतात का? मराठा समाजाच्या मताशिवाय 43 टक्के मतं मिळू शकतात का? आम्हाला मराठा समाजानं मत दिलं, ओबीसी समाजानं मत दिलं. सर्वांनी मत दिलं.
- आम्ही मराठा आरक्षण दिलं : पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री बनले. त्यांनी आरक्षण दिलं नाही. त्यानंतरच्या तीस वर्षात साडेचार वर्षांचा कालावधी सोडला तर सतत काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी कधीही मराठा आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं. मी मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात आम्ही जिंकलो. सुप्रीम कोर्टात आम्ही टिकवलं. त्यानंतर पुन्हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. त्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा शिंदेसाहेब झाले आम्ही पुन्हा आरक्षण दिलं.