NDTV Exclusive:लोकसभेत पराभव, विधानसभेची निवडणूक लढणार का? पंकजा मुंडेंचे उत्तर काय?

लोकसभेला पराभव होणे हे पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जातोय. शिवाय पंकजा यांचे पुढचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. अशा वेळी पंकजा मुंडे यांनी एनडीटीव्हीला Exclusive मुलाखत दिली आहे.

Advertisement
Read Time: 4 mins

बीड, राहुल कुलकर्णी 

बीड लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या विधानसभेनंतर 2024 च्या लोकसभेलाही पराभव होणे हे पंकजा यांच्यासाठी मोठा धक्का समजला जातोय. शिवाय पंकजा यांचे पुढचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. अशा वेळी पंकजा मुंडे यांनी एनडीटीव्हीला Exclusive मुलाखत दिली आहे. यात त्यांनी पराभव का झाला? पुढची राजकीय दिशा काय असणार? अजित पवारांबरोबर युती करणे महागात पडले का? या आणि यासारख्या अन्य प्रश्नांना बेधडत उत्तरे दिली आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पराभव का झाला?    

बीड लोकसभा निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग दिला गेला. जरांगे फॅक्टर बीडमध्ये चालला. विरोधकांनी जो नरेटिव्ह सेट केला होता त्याला यश आले. त्यामुळेच पराभवाला सामोर जावे लागले असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनाचा नक्कच फटका बसला असं ही त्या म्हणाल्या. पराभव हा पराभव असतो. तो स्विकारायचा असतो. लोकांची दिशाभूल केली गेली. मात्र ती कायम राहाणार नाही असेही त्या म्हणाल्या. निकालानंतर बीडमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसले नाही. माझा पराभव झाल्याने जिल्ह्याची एक मोठी संधी गेली असे जनतेला आता वाटत असेल असेही त्या म्हणाल्या. शिवाय मला पाडून काय साध्य झाले असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. जात हा विषय आता निवडणुकी पुरता मर्यादीत राहीला नाही. तो गंभीर झाला आहे असं सांगायला त्या विसरल्या नाहीत.  

Advertisement

'पराभवाने खचणार नाही'  

पराभव झाल्याने आपण अडगळीत पडू असे होणार नाही. विजय आणि पराभव हा एक अपघात असतो. माझ्या वडिलांनी मला बेरजेचे राजकारण शिकवलं आहे. त्यानुसार आपली पुढची वाटचाल सुरूच राहील असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आता झाली आहे. पराभव झाला हे मान्य केले आहे. जसा बीडमध्ये पराभव झाला तसा इतर राज्यात इतर पक्षांचा देखील झाला आहे. सध्याचे राजकारण अतिशय वाईट झाले आहे. नेते थेट जातीवर बोलत आहेत. जातीचे विष शाळांपर्यंत पोहचले आहे. ते जास्त गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. पण ही वेळही निघून जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

'मुंडे साहेबांचा मृत्यू पचवला पण माझा पराभव...' 

पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. त्यांने आपण हादरून गेल्याचे पंकजा यांनी सांगितले. पराभवाची बातमी समोर आल्यानंतर त्या दिवशी अनेक गावांत चुली पेटल्या नाहीत. त्याचं दुख: वाटलं. शिवाय लोकांनी आत्महत्या केल्या यामुळे अस्वस्था व्हायला झालं. लोकांनी मुंडे साहेबांचा मृत्यू पचवला पण माझा पराभव ते पचवू शकले नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ज्या तरूणाने आत्महत्या केली त्याची आई सांगते ताई काळजी करू नका. विजय खेचून आणू शकलो नाही हे अपराधी असल्या सारखे वाटते. हे सांगताना पंकजा भाऊक झाल्या.   

Advertisement

मनोज जरांगेंना भेटणार का? 

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला. आता जरांगेंची भेट तुम्ही घेणार का असा प्रश्न त्यांनी विचारला गेला. त्यावर त्यांना का भेटावं असा प्रतिप्रश्न पंकजा यांनी केला. आंदोलन भडकलं होतं त्यात माझा काय रोल होता? माझा काय दोष होता असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनात याआधी कधीही राजकारण आले नव्हते असेही त्या म्हणाल्या. आता पुढच्या काळात जरांगेचं किती लोक ऐकतात ते पहावे लागेल. त्यांनी जी ताकद दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असेही पंकजा म्हणाल्या. पण यातून त्यांना काय मिळालं याची मला प्रतिक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय भूमिका घेणार नाही असे जरांगेंनी सांगितले होते. पण त्यांची जशी भूमिका बदलते तशी त्यांच्या समर्थकांची ही बदलते. त्यांच्या आंदोलनाला मी नेहमीच शुभेच्या दिल्या असेही त्या म्हणाल्या. माझ्या बद्दल ते काय विचार करतात ते मी सांगू शकत नाही. पण त्यांच्या आंदोलनाचे पुढे काय होणार याची मला नक्कीच प्रतिभा आहे. सरकार त्यांच्याबाबत काय निर्णय घेते ते ही पाहाणार आहे.  

अजित पवारांचा किती फायदा झाला? 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि आमचे मतदार हे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याचा निर्णय काहींना आवडला नाही असेही पंकजा मुंडे स्पष्ट पणे बोलल्या. असे असले तर  मी पक्षाच्या चौकटी बाहेर काही बोलत नाही असेही त्या म्हणाल्या. पण अजित पवारांना बरोबर घेतल्यानंतर एक वेगळे गणित निर्माण झाले होते. ते स्विकारण्यासाठी काही वेळ लागेल असेही त्या म्हणाल्या. अजित पवारां सोबत जाण्याचा निर्णय चुकला का?  हे समजण्यासाठी आणखी काही वेळ लागेल हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. 

पवार -ठाकरें बाबत सहानुभूती 

या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती होती. हे नाकारता येत नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. काँग्रेस बाबतही त्यांनी वक्तव्य केले आहे. एक पक्ष कमी झाला की दुसरा वाढणार हे घडत राहाणारी प्रक्रीया आहे. मागील वेळी काँग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र आता काँग्रेसने मुसंडी मारली हेही नाकारून चालणार नाही. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. 

विधानसभा लढणार का? 

लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला ही पंकजा यांनी उत्तर दिले आहे. मी लोकांमध्ये काम करणारी आहे. त्यामुळे भविष्यात पक्षाच्या नेत्यांनी माझाबाबत काय निर्णय घ्यावा हे मी ठरवू शकत नाही. तो निर्णय पक्षच घेईल. लोकसभेची उमेदवारी मला पक्षानेच दिली होती. पुढे विधानसभा लढवायची की नाही याबाबत कोणताही विचार केलेला नाही. मात्र आपला राज्यात उपयोग होणार असेल तर राज्यात काम करण्याची तयारीही पंकजा मुंडे यांनी दर्शवली आहे.