लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका स्टेजवर येऊन सर्वांसमोर चर्चा करावी, असं निमंत्रण देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्यासह देशातील काही प्रतिष्ठित मंडळींनी याबाबत दोन्ही नेत्यांना पत्र पाठवलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पत्राला उत्तर दिलंय.
( नक्की वाचा : भाजपाच्या घटनेनुसार पंतप्रधान मोदी रिटायर होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर )
मला तुमचे निमंत्रण मिळाले. या प्रकारच्या चर्चांचा मतदारांना त्यांच्या नेत्यांचं व्हिजन समजण्यास उपयोग होईल. मी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेत सहभागी होणार आहेत का? हे आम्हाला कळवावं, या आशयाचं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं आहे. या प्रकारच्या ऐतिहासिक चर्चेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
काय होतं पत्र?
माजी न्यायाधीश मदन बी लोकूर यांच्यासह काही प्रतिष्ठित मंडळींनी हे पत्र लिहिलं होतं. 'आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. सर्व जगाला आपल्या निवडणुकीत रस आहे. त्यामुळे या प्रकारच्या सार्वजनिक चर्चेतून नवं उदाहरण निर्माण होईल. एका निरोगी आणि जिवंत लोकशाची खरी प्रतिमा यामधून निर्माण होईल, असं मजकूर या पत्रामध्ये होता.