Will Sharad Pawar Join NDA? : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्तानं राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन तट असले तरी, स्थानिक पातळीवर मात्र वेगळीच समीकरणे आकाराला येत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी हातमिळवणी केल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे पवारांची रणनीती?
पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही भाग पवार कुटुंबाचे बालेकिल्ले मानले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी एक नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वैचारिक पातळीवर ते सध्या महायुतीमध्ये असले तरी अनेक मुद्द्यांवर त्यांची भूमिका भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा वेगळी राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपले काका शरद पवार यांच्याशी संवादाचे दरवाजे खुले ठेवले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये शरद पवार गटातील अनेक महत्त्वाचे नेते आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांनंतरच पिंपरी चिंचवडसाठी दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, अशीच चर्चा पुणे महानगरपालिकेबाबतही सुरू असल्याचे समजते.
(नक्की वाचा : Pune News : 50 पावसाळे, शून्य खड्डे; पुण्याच्या 'या' ऐतिहासिक रस्त्याचा 1 जानेवारीला सुवर्णमहोत्सव, वाचा रहस्य )
बारामतीमधील भेट टर्निंग पॉईंट
बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट या संपूर्ण घडामोडींचा टर्निंग पॉइंट ठरली आहे. त्यानंतर झालेल्या एका मेळाव्यात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी युतीची अधिकृत घोषणा केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी घड्याळ आणि तुतारी आता एकत्र आले आहेत, असे अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले. पवार कुटुंब आता एकत्र आले आहे, असे वक्तव्य करत त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य केवळ स्थानिक निवडणुकीपुरते मर्यादित नसून त्याचे संकेत राष्ट्रीय राजकारणापर्यंत जात असल्याचे बोलले जात आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवणार, शिंदेंचा ठाकरेंवर डोंबिवलीतून थेट प्रहार, युतीबाबत म्हणाले.. )
शरद पवार NDA च्या वाटेवर?
पिंपरी चिंचवडमधील ही युती वरवर पाहता दोन समान विचारधारेच्या पक्षांमधील स्थानिक तडजोड वाटत असली, तरी त्यामागे एक मोठा राष्ट्रीय संदेश दडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. हे शरद पवार यांची एनडीएच्या दिशेने पडलेली पहिले पाऊल तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच अजित पवार यांच्याशी युती करण्यात काहीच गैर नसल्याचे म्हटले होते. अजित पवार यांनी आपली विचारधारा कधीच सोडलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्येही बदलत्या राजकीय वातावरणाचे संकेत मिळत आहेत.
भाजपाची भूमिका आणि नव्या शक्यता
अजित पवार महाविकास आघाडीत असोत किंवा आताच्या महायुतीमध्ये, त्यांनी नेहमीच स्वतःला सेक्युलर राजकारणाचे समर्थक म्हणून मांडले आहे. हाच समान वैचारिक आधार आता दोन्ही पवारांना एका व्यासपीठावर घेऊन येत आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, भाजपा भविष्यात शरद पवार यांचे एनडीए मध्ये स्वागत करण्यास तयार आहे. जर असे झाले तर एनडीएसाठी हे मोठे रणनीतिक यश मानले जाईल. मात्र, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काहीशी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीला बसू शकतो धक्का
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या समीकरणासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून नवीन युती होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अजित पवार यांची राजकारण करण्याची पद्धत केवळ पिंपरी चिंचवडपुरती मर्यादित नाही. मुंबईत स्वबळावर लढण्याचा पवित्रा आणि नवाब मलिक यांच्यासारख्या विषयावर ठाम राहून त्यांनी स्वतःचा वेगळी भूमिका मांडली आहे.
पिंपरी चिंचवडमधील पवारांची ही एकजूट महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानली जात आहे. आगामी काळ हा केवळ स्थानिक सत्तेचा संघर्ष नसून मोठ्या राजकीय बदलांची प्रयोगशाळा ठरणार आहे.