KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचं मतदान होईल. या निवडणुकीतील सर्व उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. पण त्यापूर्वीच राजकीय मैदानात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे.
डोंबिवलीमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या विजय निर्धार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर जोरदार टीका केली. ही सभा आगामी निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शनाची ठरली असून, शिंदे यांनी भाषणातून विरोधकांच्या कथित ब्रँडवर जोरदार हल्ला चढवला आहे. महापालिका निवडणुकीत युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्री आणि मी त्यामध्ये चर्चा करत आहोत, बाहेर कोण काय सांगतंय त्यावर लक्ष देऊ नका असंही शिंदेंनी यावेळी सांगितलं.
ठाकरे बंधूंच्या ब्रँडचा वाजणार बँड
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. स्वतःला ब्रँड म्हणवून घेणाऱ्यांचा येणाऱ्या निवडणुकीत बँड वाजणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला.
केवळ ब्रँडचे लेबल लावून राजकारण चालत नाही, तर त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात, असा टोला त्यांनी लगावला. जे केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, त्यांना जनताच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
( नक्की वाचा : Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा )
मराठी माणसासाठी काय केले?
मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिंदे यांनी थेट आव्हान दिले. मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत असे सांगणाऱ्यांनी मराठी बांधवांसाठी नेमके कोणते एक ठोस काम केले आहे, हे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.
संकटकाळात आणि नगरपरिषद निवडणुकांच्या वेळी महाविकास आघाडीचे नेते कुठे होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांवर कडाडून टीका केली. महायुती सर्वत्र भक्कमपणे उभी असताना विरोधक मात्र केवळ चर्चाच करत राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट! समन्वय समितीच्या पत्रावर फक्त एकाचीच सही, महायुतीमध्ये नेमकं काय शिजतंय? )
खुर्चीसाठी हिंदुत्वाशी तडजोड नाही
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी ठाकरेंना घेरले. हिंदुत्व आणि मराठी माणूस हे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेने कधीही हिंदुत्वाशी प्रतारणा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता टिकवण्यासाठी, स्वार्थासाठी आणि खुर्ची वाचवण्यासाठी विरोधकांनी हिंदुत्वाशी तडजोड केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आमची लढाई खुर्ची मिळवण्यासाठी नसून सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे, असे सांगत त्यांनी महायुतीचा भगवा आगामी महानगरपालिका निवडणुकीतही अभिमानाने फडकणार असल्याचे जाहीर केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world