विनेश आणि बजरंगवर साक्षी मलिक नाराज? काँग्रेस प्रवेशावर दिलेल्या प्रतिक्रियेचा अर्थ काय?

Sakshi Malik on Vinesh Phogat and Bajrang Punia : बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची आंदोलनातील सहकारी साक्षी मलिकनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट कुस्तीपटूंनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. आगामी हरयाणा विधानसभा निवडणूक ते लढणार आहेत. बजरंग आणि विनेशसह ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिकनं गेल्या वर्षी नवी दिल्लीतीतील जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. या सर्वांनी कुस्ती फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष ब्रुजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी लढा दिला. या प्रकरणातील कायदेशीर लढाई अजूनही सुरु आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

साक्षी करणार नाही प्रचार

बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची आंदोलनातील सहकारी साक्षी मलिकनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. साक्षी मलिक या दोन्ही कुस्तीपटूंच्या प्रचारात उतरेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण, तिनं प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं. साक्षीनं ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेनंतर साक्षी मलिक विनेश आणि बजरंगवर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

'काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय वैयक्तिक आहे. आपण त्याग केला पाहिजे असं माझं मत आहे. आमच्या आंदोलनाला चुकीचं रुप देऊ नका. मलाही मोठ्या ऑफर आल्या होत्या. पण, मी नेहमीच कुस्तीचा विचार करते. कुस्तीच्या हितासाठी काम करत राहील. फेडरेशनची प्रतिमा स्वच्छ होत नाही, मुली आणि बहिणींचं शोषण थांबत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरु असेल,' असं साक्षीनं सांगितलं.

( नक्की वाचा : एका बाजूला बजरंग, दुसऱ्या बाजूला विनेश, राहुल गांधींच्या फोटोची Inside Story )

विनेश आणि बजरंगचा प्रचार करणार का? असा प्रश्न साक्षीला विचारण्यात आला. त्यावर मी राजकीय व्यक्ती नाही. माझा तो उद्देश नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. माझी लढाई ब्रुजभूषण सिंह यांच्या विरोधात होती आणि ब्रुजभूषण सिंह यांच्या विरोधात आहे. त्याशिवाय माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष किंवा प्रेम नाही,' असं साक्षीनं स्पष्ट केलं. 

Advertisement

त्यापूर्वी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश केला. विनेशनं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला. या प्रवेशानंतर हे दोघंही हरयाणा विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं आहे. 

Advertisement