शरद पवारांनी फासे टाकले, नाईक कुटुंबात फूट? पुसद मतदार संघात मोठा उलटफेर होणार?

शरद पवार विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी काही झालं तरी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आणायची यासाठी चंग बांधला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
यवतमाळ:

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मनोहर नाईक यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मनोहर नाईक हे अनेक वर्ष जिल्ह्यातील पुसद मतदार संघातून विधानसभेवर गेले. राज्याच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते. सध्या या मतदार संघात इंद्रनील नाईक हे आमदार आहेत. त्यांचे बंधु ययाती नाईक ही आता विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली होती. तर ययाती नाईक हे शरद पवारांबरोबर आहेत. ते आगामी निवडणूक पुसद मतदार संघातून आपल्या भावा विरोधातच लढणार आहेत. या निमित्ताने नाईक कुटुंबातच फूट पडल्याचे दिसून येत आहे.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंद्रनील नाईक हे सध्या पुसद विधानसभेचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. भाजपच्या निलय नाईक यांचा पराभव केला होता. पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले. हे सरकार कोसळले. शिवसेनेत फूट पडली. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार जवळपास 40 आमदार घेवून वेगळे झाले. त्यात इंद्रनील नाईक यांनी शरद पवारां ऐवजी अजित पवारांना साथ दिली. 

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे दोन ठराव, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावर

त्यांची ही कृती त्यांचे बंधु ययाती नाईक यांना पटली नाही. त्यांनी आपली नाराजीही जाहीर पणे व्यक्त केली. इंद्रनील यांनी अजित पवारांना साथ देण्या आधी कुटुंबा बरोबर चर्चा करायला हवी होती असे ते म्हणाले. शिवाय ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली त्यावेळी त्यांच्याबरोबर सुधाकरराव नाईक होते. अशा वेळी नाईक कुटुंबाने शरद पवारांची साथ देणे गरजेचे होते. लोकसभा निवडणुकीत ही आपल्याला विचारात घेतले गेले नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

ट्रेंडिंग बातमी - हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसणार, भाजपने फासे टाकले, बडा नेता गळाला

या पार्श्वभूमीवर ययाती यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शिवाय ते शरद पवारांना साथ देणार आहेत. त्यांनी आपल्याला पुसद विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी आपलाच भाऊ इंद्रनील नाईक यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. जर ययाती यांना उमेदवारी मिळाली तर इथं भाऊ विरुद्ध भाऊ आमने सामने असतील. नाईक कुटुंबाचा राजकीय वारसदार कोण हे ही या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.    

ट्रेंडिंग बातमी - मविआतला मुंबईतल्या 'त्या' जागांवरचा तिढा सुटला, ठाकरेंच्या पारड्यात कोणती जागा?

शरद पवार विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी काही झालं तरी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आणायची यासाठी चंग बांधला आहे. पक्ष फुटीनंतर त्यांनी पक्षाची नव्याने बांधणी केली आहे. नव्या दमाच्या तरूणांना संधी देण्याचे त्यांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक मतदार संघात शरद पवार नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे स्पष्ट आहे. त्यात आता नाईक कुटुंबातीलच एक मोहरा त्यांच्या गळाला लागला आहे. त्यामुळे पुसद मतदार संघातील लढत ही रंगतदार होणार आहे.