Aamir Khan's third marriage controversy : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची सध्या विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी गौरी स्प्रैटसोबत सिव्हिल मॅरेज केल्यानंतर आमिर खानला टीकेचा सामना करावा लागत आहे. अनेक हिंदू संघटनांनी त्याच्यावर लव लिहादचा आरोप केला आहे. तर उत्तर प्रदेशात त्याच्याविरोधात एक फतवादेखील जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याला दोषी मुस्लीम पुरुष म्हटलं आहे. या सर्व वादादरम्यान आमिर खानने पहिल्यांदा याबाबत मोकळेपणाने आपली भूमिका मांडली. त्याने स्पष्ट केलं की, त्याची पत्नी गौरी स्प्रैट हिंदू नाही तर ख्रिश्चन आहे. त्याच्या कोणत्याही पत्नीने लग्नानंतर धर्म बदलला नाही. सोबतच त्याने आपल्या कुटुंबातील धार्मिक विविधतेचं उदाहरण देत म्हटलं की, त्याच्या घरात नेहमीच सर्व धर्मांचा सन्मान केला जातो, असं म्हटलं आहे.
आमचं कुटुंब सर्व धर्माचा सन्मान करतात...
नुकतच रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने लव जिहादच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्याच्या कुटुंबात वेगवेगळ्या धर्माचे सदस्य आहेत आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. आमिरने पुढे सांगितलं की, त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न हिंदू कुटुंबात झाली आहेत. त्याच्या मुलीनेही एका हिंदू मुलाशी लग्न केलं. तर त्याचा चुलत भाऊ मन्सूरने एका ख्रिश्चन महिलेसोबत लग्न केलं. त्याच्या कुटुंबात कधीच धर्माला नात्याच्या आड येऊ दिलं नाही. त्याच्या मते, माणुसकी आणि एकमेकांचा सन्मान कोणत्याही धर्मापेक्षा महत्त्वाचा आहे.
गौरी हिंदू नाही तर ख्रिश्चन आहे...कोणीच धर्म बदलला नाही...
आमिर खानने सांगितलं की, त्याच्या तिन्ही पत्नी हिंदू होत्या हे चुकीचं आहे. गौरी स्प्रैट ख्रिश्चन आहे. आणि तीदेखील एक अशी ख्रिश्चन जी धर्माचे फारसे पालन करत नाही. आमिरने हेदेखील स्पष्ट केलं की, रीना दत्ता, किरण राव आणि गौरी स्प्रैट पैकी कोणीच लग्नानंतर धर्म परिवर्तन केलं नाही. त्याची सर्व लग्न सिविल मॅरेजअंतर्गत झाली आहेत. त्यामुळे धर्म बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमिर पुढे म्हणाला, वेळेनुसार त्याचं आयुष्य अधिक सुंदर होत आहे.
फतव्यानंतर वाद का वाढला?
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नानंतर अनेक संघटनांनी त्याच्याविरोधात आंदोलन केलं आणि त्याच्यावर लव जिहादला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. यादरम्यान उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इफ्राहीम हुसैन यांनी त्याच्याविरोधात फतवा जारी केला. मुफ्ती म्हणाले, इस्लामी मान्यतेनुसार, एखाद्या मुस्लीम पुरुषाने आपल्या धर्माचं पालन करणाऱ्या गैर-मुस्लीम स्त्रीशी विवाह करणं योग्य नाही. या विधानामुळे वाद आणखी वाढला.
मात्र आमिर खानने आपल्या उत्तरात कोणतीही संघटना किंवा व्यक्तीवर टिप्पणी करण्याऐवजी आपलं लग्न, कुटुंब आणि धर्माबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याने पुन्हा सांगितलं की, त्याच्या कुटुंबात कोणावरही धर्म बदलण्यासाठी दबाव नव्हता आणि सर्व नाती एकमेकांमधील सन्मान आणि समंजसपणावर आधारित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world