Addinath Kothare Divorce: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेली जोडी म्हणजे अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. पण आता या चर्चांवर पूर्णविराम लागला असून आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी अखेर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दोघांनीही सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट शेअर करत सामंजस्याने घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वाला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय म्हटले आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये?
आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "खूप विचार केल्यानंतर, आम्ही एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे." जोडीदार म्हणून त्यांचा प्रवास जरी इथेच संपत असला, तरी त्यांच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
मुलीसाठी 'को-पॅरेंटिंग' करणार
पती-पत्नी म्हणून वेगळे होत असले तरी, आई-वडील म्हणून ते नेहमी एकत्र असतील हे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपली मुलगी 'जिजा' हिचा विशेष उल्लेख केला आहे. "जिजा आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत," असे त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.
(नक्की वाचा: 'गौरी हिंदू नाही तर...'; लव जिहाद आरोपांवर पहिल्यांदाच आमिरने मांडली भूमिका, पहिल्या 2 पत्नींविषयी म्हणाला...)
प्रायव्हसीचा आदर करण्याची नम्र विनंती
आजवरच्या प्रवासात मीडिया, हितचिंतक आणि चाहत्यांनी जे भरभरून प्रेम आणि साथ दिली, त्याबद्दल आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. आयुष्याच्या या नव्या वळणावर सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त करत, "आमच्या या खासगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा," अशी विनंती त्यांनी केली आहे.
(नक्की वाचा: Medha Manjrekar: 'हा कठीण प्रवास एकटीने नाही केला...' मेधा मांजरेकरांना गंभीर आजाराचे निदान, भावुक पोस्ट VIRAL)
आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांची सोशल मीडिया पोस्ट
तसेच घटस्फोटाच्या विषयावर हेच आपले एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे यावर कोणतीही चर्चा किंवा प्रतिक्रिया देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आदिनाथ आणि ऊर्मिला हे दोघेही मराठी मनोरंजन विश्वातील मोठे चेहरे आहेत. अनेक वर्षे ते सुखी वैवाहिक जीवन जगत होते. त्यांच्या या अचानक आलेल्या विभक्त होण्याच्या घोषणेने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.