'लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते!', अतुल परचुरेंच्या निधनानंतर सारेच हळहळले

Atul Parchure : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अतुल परचुरेंच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते.  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक, तसंच छोटा पडदा गाजवणाऱ्या अतुल परचुरेंच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अतुल परचुरेंच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  परचुरे यांच्यावर मंगळवारी (15 ऑक्टोबर 2024) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक  - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली. रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली.

(नक्की वाचा : धक्कादायक एग्झिट, अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन )
 

नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.' अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान - फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या विनोदी भूमिकांमार्फत त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!, अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली. 

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व स्व. पु. ल‌. देशपांडे यांची संस्मरणीय भूमिका त्यांनी साकारली. याखेरीज त्यांनी टिव्हीवरील काही मालिकांमध्ये तसेच चित्रपटांत साकारलेल्या भूमिका देखील गाजल्या. ते गेली काही दिवसांपासून कर्करोगाचा सामना करीत होते. त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अतुल परचुरे कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या कालकारांनीही त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. 

लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते, खुप लढलास! खुप सहन केलेस . तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो व कुटुंबास दु:ख सहन करण्याची शक्ती, अशी भावना अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी व्यक्त केली आहे.